Join us  

मोठ्या पगाराची गरज नाही; पहिल्या सॅलरीपासूनच 'या' गोष्टी फॉलो करा, व्हाल कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 2:50 PM

आपण कोट्यधीश बनावं हे प्रत्येकाचे स्वप्न असते. खर्च आणि बचत करण्याची योग्य रणनीती अवलंबली तर हे स्वप्न नक्कीच पूर्ण करता येऊ शकतं.

आपण कोट्यधीश बनावं हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण आजच्या काळात जर तुम्ही तुमच्या पहिल्या उत्पन्नासोबतच खर्च आणि बचत करण्याची योग्य रणनीती अवलंबली तर हे स्वप्न नक्कीच पूर्ण करता येऊ शकतं. अनेक वेळा लोकांचं अर्धे आयुष्य निघून जातं आणि ते त्यांच्या कमाईचे योग्य मॅनेजमेंट करण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळेच त्यांना आयुष्यभर पैशाची कमतरता आणि संघर्षाचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला आगामी काळात स्वतःला कोट्यधीश बनवायचं असेल तर पुढील काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

बजेट तयार करातुम्ही पाहिलेच असेल की पूर्वी घरातील वडीलधारी मंडळी एक डायरी ठेवत असत, ज्यामध्ये सर्व खर्च लिहिलेला असायचा. त्यांची ही सवय तुम्हीही अंगीकारली पाहिजे. आपल्या कमाईच्या प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवा. तुम्ही कशावर खर्च करत आहात याची जाणीव असायला हवी. प्रत्येक महिन्यासाठी बजेट सेट करा आणि बचत करा, तसंच त्यानुसार खर्च करा.

अशी बचत कराबचतीचं एक सूत्र आहे ज्याच्याशी बहुतेक आर्थिक तज्ज्ञ सहमत आहेत. हे सूत्र ५०:३०:२० आहे. या सूत्रानुसार, प्रत्येक व्यक्तीनं त्याच्या पगारातील किमान २० टक्के बचत केली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या उत्पन्नातील ५० टक्के घरातील आवश्यक खर्च जसे की खाणंपिणं, राहणं, मुलांचं शिक्षण इत्यादींवर खर्च केले पाहिजे. तसंच इतर खर्चासाठी ३० टक्के ठेवू शकता. ते कोणत्याही अचानक आलेल्या कामासाठी किंवा तुमचे काही छंद पूर्ण करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या पगाराच्या ८० टक्क्यांपर्यंत तुमच्या सर्व गरजा आणि छंदांवर खर्च करू शकता. परंतु कोणत्याही परिस्थितीत २० टक्के बचत ही केली पाहिजे.

गुंतवणूक करातुम्ही जी काही २० टक्के बचत केली आहे, ती तुम्ही गुंतवली पाहिजे. गुंतवणूक हा एकमेव मार्ग आहे ज्यामुळे तुमचा पैसा जलद वाढेल. तुम्‍हाला मोठा फंड जोडायचा असल्‍यानं तुम्‍हाला दीर्घकाळ गुंतवण्‍याची सवय लावावी लागेल. आजच्या काळात, पीपीएफ, एसआयपी इत्यादीसारख्या अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही मासिक काही रक्कम गुंतवू शकता आणि दीर्घकाळात मोठा परतावा मिळवू शकता.

कसे बनाल कोट्यधीशआजच्या काळात, SIP हा गुंतवणुकीचा एक चांगला मार्ग मानला जातो. याद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता. बाजाराशी जोडलेले असूनही, दीर्घकालीन एसआयपी मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देत असल्याचं दिसून आलं आहे. बाजाराशी जोडलेले असल्यानंच एसआयपीमध्ये निश्चित परतावा मिळत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. परंतु सरासरी यात १२ टक्के नफा मिळालेला आहे, जो कोणत्याही योजनेपेक्षा चांगला आहे.

समजा तुमचा पगार २५,००० रुपये आहे ज्यात तुम्हाला संपूर्ण घर चालवावं लागेल. अशा स्थितीत २० टक्क्यांप्रमाणे तुम्हाला ५ हजार रुपये वाचवावे लागतील आणि ते गुंतवावे लागतील. समजा तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा ५००० रुपये गुंतवले, तर एका वर्षात ६०,००० रुपयांची गुंतवणूक होईल. तुम्ही ही गुंतवणूक २६ वर्षे सतत सुरू ठेवल्यास, तुम्ही एकूण १५,६०,००० ची गुंतवणूक कराल. परंतु त्यात तुम्हाला ९१,९५,५६० रुपयांचं व्याज मिळतील. अशा प्रकारे, तुम्हाला मॅच्युरिटीवर १,०७,५५,५६० रुपये मिळतील. म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही २६ वर्षात कोट्यधीश होऊ शकता.

(टीप - यात सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तंज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा