Join us  

ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 8:55 AM

Aadhaar Enabled Payment System : आधार कार्ड हे महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक बनलं आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक झालंय. केवळ ओळखपत्र म्हणून नव्हे तर पैशांच्या व्यवहारासाठीही याचा वापर होऊ शकतो.

Aadhaar Enabled Payment System : आधार कार्ड हे महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक बनलं आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक झालंय. केवळ ओळखपत्र म्हणून नव्हे तर पैशांच्या व्यवहारासाठीही याचा वापर होऊ शकतो. आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टिमच्या (एईपीएस) माध्यमातून तुम्ही बँक खात्यातून पैसे काढणं, जमा करणं आणि दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करणं यासारख्या गोष्टी करू शकता. डिजिटल व्यवहार सोपे आणि सुरक्षित करण्यासाठी नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ही प्रणाली विकसित केली आहे.

AePS हे आधार युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) वर आधारित आहे. हे एक बँक आधारित मॉडेल आहे, ज्याद्वारे आधार क्रमांक आणि फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनद्वारे व्यवहार करता येतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात बँक डिटेल्सची गरज नाही किंवा ओटीपी किंवा पिनची ही गरज नाही. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं बंधनकारक आहे. एक आधार कार्ड अनेक बँक खात्यांशी जोडलं जाऊ शकते आणि या प्रणालीद्वारे कोणत्याही समस्येशिवाय व्यवहार केले जाऊ शकतात.

AePS द्वारे मिळणाऱ्या सुविधा

  • बॅलन्स चेक : तुम्ही तुमच्या खात्यातील बॅलन्स चेक करू शकता.
  • पैसे काढणं : तुम्ही थेट बँक खात्यातून पैसे काढू शकता.
  • पैसे जमा करणं : तुम्ही बँक खात्यात पैसे जमा करू शकता.
  • आधार ते आधार फंड ट्रान्सफर : आधार क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.
  • पेमेंट : आधार बेस्ड पेमेंट सिस्टीमद्वारे व्यवहार करता येतात. 

व्यवहार कसा करायचा?

एईपीएस वापरण्यासाठी, आपल्याला बँकिंग प्रतिनिधी किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) ऑपरेटरकडे जाणं आवश्यक आहे. डिजिटल व्यवहारांसाठी बँकेकडून बँकिंग करस्पॉन्डंटला जबाबदारी दिली जाते. त्यांना आपल्या घरी बोलावूनही तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता. आधार अनेबल्ड पेमेंट सिस्टीम विशेषत: ग्रामीण किंवा दुर्गम भागात राहणाऱ्या आणि बँकिंग सेवांपर्यंत पोहोच नसलेल्यांसाठी उपयुक्त आहे.

या सुविधेमुळे ग्राहकांना बँकेच्या शाखेत न जाता घरबसल्या मूलभूत बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार आहे. बँकिंग सेवा सोपी, सुरक्षित आणि सर्वांसाठी सुलभ करून एईपीएसनं डिजिटल इंडियाच्या दिशेनं मोठं पाऊल उचललं आहे.

टॅग्स :आधार कार्डपैसा