Join us

आता Airtel देणार FD ची सेवा, मिळणार बँकांपेक्षा अधिक व्याज; अ‍ॅपद्वारे उघडू शकता एफडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 10:54 AM

सध्या अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. अनेक जण आजही फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय मानतात. दरम्यान, आता भारती एअरटेल फायनान्स अंतर्गत एक नवा फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस सुरू करण्यात आलेय. जाणून घ्या कसा घेऊ शकता याचा लाभ.

सध्या अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. अनेक जण आजही फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय मानतात. शेअर बाजारात जोखीम अधिक असल्यानं परताव्याची शाश्वती नसते. दरम्यान, आता भारती एअरटेल फायनान्स अंतर्गत एक नवा फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस सुरू करण्यात आलेय. एअरटेल थँक्स अॅपवरच याचा वापर करता येणार आहे. यामध्ये किमान १००० रुपयांपासून ग्राहकांना एफडी करता येईल. यासाठी ग्राहकांना कोणतं वेगळं बँक खातंही उघडण्याची गरज नाही. सध्या ही सुविधा केवळ अँड्रॉईड डिव्हाईसवर मिळत आहे. लवकरच याचा वापर iOS वरही करता येईल.

फिक्स्ड डिपॉझिटसाठी पार्टनरशीप

एअरटेल फायनान्सनं या सेवेसाठी स्मॉल फायनान्स बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांशी (एनबीएफसी) भागीदारी केली आहे. यामध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, शिवालिक बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि श्रीराम फायनान्स यांचा समावेश आहे. ग्राहक सात दिवसांनंतर कधीही त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटमधून पैसे काढू शकतात.

कशी सुरू करू शकता एफडी?

  • सर्वप्रथम आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवर एअरटेल थँक्स अॅप इन्स्टॉल करा.
  • अॅपमधील फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेसला भेट द्या आणि सर्व पर्यायांची तुलना करा, जिथे तुम्हाला ९.१% पर्यंत व्याजदर मिळू शकतो.
  • आपली सर्व माहिती भरा आणि नो योर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करा, जी गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.
  • १००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम निवडा आणि आपल्या सध्याच्या बँक खात्यातून पैसे भरा. यासाठी तुम्हाला नवीन बँक खात्याची गरज नाही.
  • एकदा फिक्स्ड डिपॉझिट सेट केल्यानंतर अॅपच्या माध्यमातून तुम्ही ते सहज मॅनेज करू शकता. एअरटेल फायनान्सच्या या पावलाकडे ग्राहकांसाठी सोपी आणि सुलभ फायनान्स सेवा म्हणून पाहिलं जात आहे.
टॅग्स :एअरटेलगुंतवणूक