FD Rates Reduced: रिझर्व्ह बँकेनं (RBI) बुधवारी रेपो दरात कपात केल्यानंतर एकीकडे बँकांनी कर्जाचे व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे काही बँकांनी आता एफडीच्या व्याजदरातही कपात करण्यास सुरुवात केलीये. त्यामुळे ग्राहकांना यापुढे एफडीवर पूर्वीसारखा मोठा नफा मिळणार नाही. खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेनं एफडीच्या व्याजदरात १५ बेसिस पॉईंट म्हणजेच ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. बँकेनं ९ एप्रिलपासून एफडीच्या व्याजदरात कपात केलीये.
जून २०२४ नंतर पहिल्यांदाच कपात
कोटक महिंद्रा बँकेनं ठराविक कालावधीच्या एफडीवर ही कपात केली आहे. या खासगी बँकेनं जून २०२४ नंतर पहिल्यांदाच एफडीच्या व्याजदरात कपात केली आहे. या ताज्या कपातीनंतर कोटक महिंद्रा बँक आता सर्वसामान्यांना एफडीवर २.७५% ते ७.३०% पर्यंत व्याज देणार आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना आता एफडीवर ३.२५ टक्क्यांवरून ७.८० टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. यापूर्वी कोटक महिंद्रा बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एफडीवर २.७५% ते ७.४०% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.२५% ते ७.९०% पर्यंत व्याज देत होती.
सर्व बँका हळूहळू व्याजदरात कपात करतील
जर तुम्ही एफडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर एफडीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. रेपो दरात कपात केल्यानंतर आता हळूहळू सर्वच बँका एफडीचे व्याजदर कमी करण्यास सुरुवात करतील. आरबीआयनं ९ एप्रिल रोजी रेपो दरात ०.२५ टक्के कपात करण्याची घोषणा केली होती. या निर्णयानंतर रेपो दर ६.२५ टक्क्यांवरून ६.०० टक्क्यांवर आला आहे. रेपो दरात कपात केल्यानंतर पंजाब नॅशनल बँक, युको बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडिया या चार सरकारी बँकांनी कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. आता उर्वरित बँकाही हळूहळू कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.