Join us  

फक्त ₹ 1000 मध्ये सुरक्षित होईल तुमच्या मुलांचे भविष्य, सरकारने आणली नवीन पेन्शन योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 7:00 PM

NPS Vatsalya: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 18 सप्टेंबर रोजी NPS वात्सल्य योजना लॉन्च करणार आहेत.

NPS Vatsalya : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलैमध्ये सादर केलेल्या आर्थिक वर्ष 2024-25 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात एनपीएस वात्सल्य (NPS Vatsalya) या नवीन पेन्शन योजनेची घोषणा केली होती. या पेन्शन योजनेत पालक आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करू शकतात. आता येत्या 18 सप्टेंबर रोजी अर्थमंत्री या योजनेची सुरुवात करणार आहेत. एनपीएस वात्सल्यमध्ये नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला जाईल. 

लहान मुले मोठी झाल्यावर त्यांची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी NPS वात्सल्य योजना तयार करण्यात आली आहे. पालक मुलांच्या वतीने या योजनेत गुंतवणूक करू शकतात. मूलं 18 वर्षांचे झाल्यावर NPS 'वात्सल्य' योजनेचे NPS योजनेत रुपांतर केले जाईल. नियमित NPS योजना सेवानिवृत्ती निधी उभारण्यास मदत करते. NPS योगदान उच्च परताव्यासाठी स्टॉक आणि बाँड यांसारख्या बाजाराशी संबंधित साधनांमध्ये गुंतवले जाते.

NPS वात्सल्य योजना काय आहे?तुमच्या मुलांच्या नावाने नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) वात्सल्य योजनेत गुंतवणूक करणे हा त्यांच्या भावी आर्थिक सुरक्षिततेची खात्री करण्याचा एक चांगला मार्ग आहे. NPS वात्सल्य ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे, जी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे व्यवस्थापित केली जाते. कोणताही भारतीय, मग तो निवासी असो अथवा अनिवासी, या योजनेत मुलांच्या नावाने खाते उघडू शकतो. मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर योजना नियमित NPS मध्ये बदलली जाईल.

खाते उघडण्याची ऑनलाइन प्रक्रिया सर्वप्रथम तुम्हाला नॅशनल पेन्शन सिस्टमच्या https://www.npscra.nsdl.co.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.त्यानंतर होमपेजवर तुम्हाला Registration नावाचा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा. तुम्हाला Register with Aadhar Card आणि Register with PAN Card असे दोन पर्याय दिसतील.आधार कार्डसह नोंदणी करा हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि OTP जनरेट करा. तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. OTP प्रविष्ट करा आणि नंतर सत्यापन बटणावर क्लिक करा.

आधार क्रमांकाशी संबंधित तुमची काही माहिती आधीच भरलेली असेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वाक्षरीची स्कॅन केलेली फोटो कॉपी अपलोड करावी लागेल. त्यानंतर तुमच्या आवडीच्या पेमेंट मोडद्वारे खाते उघडण्याचे शुल्क भरा. यशस्वी पेमेंट केल्यानंतर तुमचे NPS खाते उघडले जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक आणि पासवर्ड मिळेल.

तुमच्या आवडीनुसार गुंतवणूक करू शकतातुम्ही आता तुमच्या मुलाच्या NPS वात्सल्य योजना खात्यात किमान 100 रुपये वार्षिक जमा करू शकता. कमाल गुंतवणूकीची मर्यादा नाही. याशिवाय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इक्विटी, डेट किंवा मनी मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. असे केल्याने तुम्ही जमा केलेल्या रकमेवर कर लाभ देखील मिळवू शकतो. तुमच्या मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याच्या NPS वात्सल्य योजनेच्या खात्यातून ती रक्कम काढता येईल. एवढेच नाही, तर तुमच्या मुलाला 60 वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शनही मिळू शकते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यास उशीर करू नका. यामुळे भविष्यात तुमच्या मुलांना आर्थिक सुरक्षा मिळेल.

टॅग्स :गुंतवणूकव्यवसायकेंद्र सरकारभाजपा