Mobikwik FD : शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडासारखे गुंतवणूक पर्याय सध्या लोकप्रिय होत आहेत. यामध्ये चांगला परतावा मिळत असला तरी धोकाही खूप आहे. त्यामुळेच मुदत ठेव किंवा एफडी योजना अजूनही एव्हरग्रीन मानली जाते. सध्या एफडीमध्ये मिळणाऱ्या व्याजदरावर बँकांमध्ये स्पर्धा आहे. आता बँकांव्यतिरिक्त ऑनलाइन पेमेंट कंपन्याही या स्पर्धेत सामील झाल्या आहेत. ऑनलाइन पेमेंट कंपन्यांनीही त्यांच्या ग्राहकांना एफडी सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. मोबिक्विक (Mobikwik) कंपनीही यात मागे नाही. ऑनलाइन पेमेंट, बिल आणि डिजिटल वॉलेट सेवा देणारी कंपनी आता नवीन ऑफर घेऊन आली आहे.
मोबिक्विकने आता आपल्या वापरकर्त्यांसाठी एफडी योजना सुरू केली आहे. मोबिक्विकने आपल्या मोबाईल ॲपद्वारे ही योजना सुरू केली आहे. यासाठी MobiKwik ने महिंद्रा फायनान्स, श्रीराम फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह सारख्या वित्तीय सेवा कंपन्यांशी भागीदारी केली आहे.
मोबिक्विक एफडी (Mobikwik FD)मोबिक्विक आपल्या ग्राहकांना मुदत ठेवीवर ९.५% पर्यंत व्याजदर देत आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे युजरला एफडी करण्यासाठी वेगळे बँक खाते उघडावे लागणार नाही. वापरकर्ते त्यांची FD फक्त १००० रुपयांनी सुरू करू शकतात. मोबिक्विकद्वारे, वापरकर्ते ७ दिवसांपासून ते ५ वर्षांपर्यंत FD करू शकतात. वापरकर्त्यांसाठी सेविंग सोपी व्हावा, हा उद्देश या योजनेमागे असल्याचे मोबिक्विकने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
मोबिक्विकवर एफडी व्याजदरमोबिक्विक आपल्या १ वर्षाच्या एफडीवर ७.५९ टक्के व्याजदर देत आहे. १ ते ३ वर्ष मुदत ठेव योजनेत सहभागी झाला तर ७.७५ व्याजदर मिळेल. तुम्हाला ३ वर्षांच्या FD वर ८.३८ टक्के व्याज मिळू शकते. याशिवाय, मोबिक्विक ४ वर्षांच्या एफडीवर ८.४७ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे, जे इतर बँकांच्या व्याजदरांपेक्षा जास्त आहे.
(डिस्लेमर : यामध्ये मुदत ठेव योजनेची माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूक सल्ला नाही. कुठल्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)