Stock Market Opening Bell: शेअर बाजारातील कामकाज शुक्रवारी घसरणीसह सुरू झालं. कामकाजाच्या सुरूवातीला बीएसई सेन्सेक्स 410 अंकांनी घसरून 72,469 अंकांच्या पातळीवर उघडला तर, निफ्टी 75 अंकांनी घसरून 21936 अंकांच्या पातळीवर उघडला आहे. परंतु नंतर त्यात थोडी रिकव्हरी दिसून आली.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी आयटी निर्देशांकात घसरण झाली होती, तर बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांक किंचित वाढीसह व्यवहार करत होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात भारती एअरटेल, सन फार्मा, सिप्ला, आयटीसी, बीपीसीएल आणि टायटन यांचे शेअर्स वधारले तर, एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस, एलटीआय माइंडट्री आणि कोटक बँक या कंपन्यांचे शेअर्स घसरले. दरम्यान, एचसीएल टेकचे शेअर्स सुमारे 4 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते.
शुक्रवारी प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 295 अंकांच्या कमजोरीसह 72,345 अंकांच्या पातळीवर कार्यरत होता, तर निफ्टी 110 अंकांच्या घसरणीसह 21901 अंकांच्या पातळीवर कार्यरत होता. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात गिफ्ट निफ्टी 15 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. गुरुवारी भारतीय शेअर बाजारात बंपर वाढ झाल्यानंतर शुक्रवारी व्यवसाय सामान्य राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. येत्या काही दिवसांत बाजार पूर्वपदावर येण्याची शक्यता असल्याचं शेअर बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.