Personal Finance Tips : भविष्यात आर्थिक स्थैर्य येण्यासाठी प्रत्येकाला आपलं आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या गरजांसाठी बचत करणे आवश्यक आहे. मात्र, बचतीचा फायदा तेव्हाच होईल, जेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर आर्थिक लक्ष्य असेल. तुमच्याकडे भविष्यातील योजनांची स्पष्टता असेल तर किती बचत आणि गुंतवणूक किती असावी हे कळेल. या बचतीसाठी तुम्ही काही स्मार्ट स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचं काम आणखी सोपं होईल.
बचतीला लक्ष्य हवं
कोणतीही बचत करताना आपण ती का करतोय? कशासाठी करतोय? हे माहीत असणे आवश्यक आहे. साधारणपणे आपण 3 कारणांसाठी बचत करतो. भविष्यात आपात्कालीन परिस्थिती, (नोकरी किंवा व्यवसाय बंद किंवा अचानक आजार), भविष्यातील आवश्यक खर्च (मुलांचे शिक्षण आणि लग्न) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवृत्तीनंतरच्या गरजा.
बचतीला सुरुवात करण्यापूर्वी किती बचत करवी? आपल्या उत्पन्नातून पैसे कसे वाचवावे? या 2 गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.
- आपल्या उत्पन्नातून टॅक्स आणि इतर कपात होऊन वास्तविक किकी पैसे खिशात येतात.
- तुमच्या निश्चित खर्चांची एक यादी तयार करा. यामध्ये तुमचे आवश्यक खर्च उदा. राशन आणि घरात लागणारे साहित्य. यावर एकूण किती खर्च होतो? तुम्हाला घर किंवा वाहनचा हप्ता चालू आहे का? या सर्व खर्चानंतर तुमच्या हातात जो पैसा शिल्लक राहतो, त्यातून तुमची बचत सुरू होते.
- सर्व खर्च वहीवर लिहून काढल्यानंतर त्याची समिक्षा करा. यामध्ये बाहेर जेवण, मनोरंजनाचे कार्यक्रम, गॅजेट्सवर किती खर्च होतो? इथं महत्त्वाचं हे आहे की तुमची बचत झाल्यानंतर या सर्व हौसेच्या गोष्टींवर खर्च करा.
- प्रत्यक्षात तुम्ही किती बचत करू शकता हे आता तुम्हाला स्पष्ट झाले असेल. वास्तविक तुमच्या उत्पन्नाच्या किमान 20 टक्के बचत करायला हवी. जर तुम्ही एवढी बचत करू शकत नसाल तर तुमच्या खर्चाची यादी पुन्हा तपासा. कुठे अनावश्यक खर्च होतो. त्यावर काठ मारा.
बचतीसोबत गुंतवणूकही महत्त्वाची
आर्थिक प्रगती करण्यासाठी केवळ बचत करुन उपयोग नाही. तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणेही आवश्यक आहे. कारण, महागाईच्या काळात गुंतवणुकीतूनच तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकता. सोबत गुंतवणूक तुमचं उत्पन्न वाढवण्यासही मदत करते.
EPF मध्ये गुंतवणूक
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) हा बचत आणि गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. तुमचा पगार खिशात येण्यापूर्वीच ही कपात केली जाते. हा दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. याचे दोन फायदे आहेत, पहिला कर बचत आणि दुसरा चांगला परतावा. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही.
ELSS फंड
कमाई आणि गुंतवणुकीसोबतच कर वाचवून बचत वाढवचे योग्य पर्याय देखील माहिती हवेत. तुमच्या समस्येवर उपाय म्हणजे ELSS. हा एक प्रकारचा कर बचत म्युच्युअल फंड आहेत. ज्यावर 80C अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे. याचा लॉक-इन कालावधी फक्त 3 वर्षांचा आहे.
इक्विटी म्युच्युअल फंड
भारतीय शेअर बाजारातील वाढीची शक्यता लक्षात घेता, डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करणे चांगले मानले जाते. तज्ञांच्या मते, तुम्ही तुमच्या टेक होम सॅलरीपैकी किमान 20 ते 30 टक्के रक्कम इक्विटी फंडांमध्ये गुंतवावी. जर तुम्ही होमलोन EMI भरत असाल, तर पगारातून वजा केल्यावर शिल्लक राहिलेली 40 टक्के रक्कम इथे गुंतवावी.
बोनस डेट फंडात
तुम्हाला तुमच्या कंपनीकडून दरवर्षी वार्षिक बोनस मिळतो. या बोनस रकमेपैकी किमान 50 टक्के रक्कम डेट फंडांमध्ये गुंतवणे महत्त्वाचे आहे. हे तुमच्यासाठी आपत्कालीन निधीसारखे काम करेल. उर्वरित बोनसची रक्कम तुम्ही मुलांचे शिक्षण, प्रवास आणि मौजमजेवर खर्च करू शकता.