Petrol Diesel: आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर आहेत. कंपन्यांकडून सामान्यांना कुठलाही दिलासा देण्यात आलेला नाही. यातच आता सार्वजनिक क्षेत्रातील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने जूनमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 10,664 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 6,147.94 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बीपीसीएलने बुधवारी स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली. कंपनीचा शेअर आज वाढून 387.90 रुपयांवर बंद झाला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती बऱ्यापैकी कमी झाल्या आहेत. पण, कंपन्यांनी दरात कोणतीही कपात न केल्याने त्यांची चांगलीच कमाई होत आहे. गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यापासून देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. गेल्या तिमाहीत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी पेट्रोलियम कंपन्यांनी त्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या नाहीत. यामुळे त्यांना गेल्या वर्षी झालेले नुकसान भरून काढण्यास मदत झाली आहे.
कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतींमुळे बीपीसीएलचे पहिल्या तिमाहीचे उत्पन्न 7 टक्क्यांनी घसरून 1.28 लाख कोटी रुपये झाले. रिफायनिंग क्रूडवर प्रति बॅरल $12.64 कमावले, जे मागील वर्षी याच तिमाहीत $27.51 प्रति बॅरल होते. जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत कंपनीचे करपूर्व उत्पन्न 41.8 टक्क्यांनी वाढून 15,809.7 कोटी रुपये झाले आहे. पहिल्या तिमाहीत या सरकारी मालकीच्या तेल कंपनीने केलेला 10,664 कोटी रुपयांचा नफा संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कमावलेल्या 2,892.34 कोटी रुपयांच्या एकूण नफ्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.
बीपीसीएल सोबत, इतर दोन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगली कमाई केली आहे. पेट्रोलवर तिन्ही पेट्रोलियम कंपन्या ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीपासून नफा कमवत आहेत, तर डिझेलवर त्यांना या वर्षी मे महिन्यातच सकारात्मक मार्जिन मिळाले.