अनेकदा नोकरी सोडल्यानंतर किंवा बदलल्यानंतर कर्मचारी पीएफ अकाऊंटमधील पैसे काढून घेतात. तो त्यांना फायदा वाटतो. तात्पुरता फायदा असेलही परंतू दीर्घकाळासाठी तो प्रचंड मोठा तोटा असतो. त्यामुळे खूपच गरज असेल तरच ते पैसे काढावेत, अन्यथा तुम्ही जेव्हा रिटायर होता, तेव्हा त्याचे बक्कळ पैसे हाती येतात. पीएफ म्हणजे तुम्ही केलेली बचतच असते. ती तुम्ही काढता म्हणजे बचत मोडता, तसेच अन्य नुकसानही होते.
नुकसान नं १.
तुम्ही तुमची नोकरी सोडल्यानंतरही पीएफवर व्याज मिळत राहते आणि पीएफचे व्याज तुमच्या एफडी आणि इतर सर्व ठेव योजनांपेक्षा जास्त असते. तुमचे पैसे वाढतच राहतात. तसेच हे पैसे काढले तर पेन्शनसाठी लागणारी महत्वाची अट म्हणजे सलग दहा वर्षे काम करण्याची ती मोडली जाते.
फायदा नं. १
नवीन नोकरी मिळवताना किंवा जॉईन करताना, जुन्या कंपनीची संपूर्ण पीएफ रक्कम नवीन कंपनीच्या पीएफ खात्यासोबत हस्तांतरित करणे चांगले आहे. तुमची नोकरी चालू आहे, असे मानले जाते. त्यामुळे पेन्शन योजनेत कोणताही खंड पडत नाही.
नुकसान नं. २
आणखी एक नुकसान म्हणजे जर तुम्ही रिटायर झाल्याझाल्या पैसे काढले तर तुम्हाला पुढचे व्याज मिळत नाही. पीएफच्या रकमेवर तीन वर्षे व्याज मिळत राहते. गेल्या काही वर्षांपासून पीएफवर आठ ते साडेआठ टक्के व्याज मिळते. तीन वर्षांनी पीएफ खाते निष्क्रीय मानले जाते.
फायदा नं. २
पीएफची रक्कम करमुक्त असते. त्यामुळे ती तुम्ही कुठेही बिनदिक्कत गुंतवू शकता. नोकरीच्या पहिल्या ५ वर्षांच्या आत तुम्ही पीएफ रक्कम काढली तर तुम्हाला कर भरावा लागतो. यामुळे जर तुम्हाला खूपच गरज असेल तर पीएफ काढावा नाहीतर तर त्या रकमेला हात लावू नये.