Join us

Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 4:51 PM

Flipkart Phone Pe IPO : जर तुम्ही ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपेच्या आयपीओची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

जर तुम्ही ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपेच्या (PhonePe) आयपीओची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वॉलमार्टच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कंपन्यांचा आयपीओ लाँच करण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. मात्र, फोनपेचा आयपीओ सर्वप्रथम लाँच करण्यात येणार आहे. वॉलमार्टचे कॉर्पोरेट अफेअर्सचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट डॅन बार्टलेट यांनी आम्ही पुढील काही वर्षांत यावर विचार करत आहोत, असं म्हटलं. 

काय आहे प्लॅन? 

बार्टलेट यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला या आयपीओंसदर्भात माहिती दिली. "फोनपेचा आयपीओ फ्लिपकार्टच्या आधी लाँच केला जाऊ शकतो. फोनपे देशातील सर्वात मोठ्या पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. भारतातील इन्स्टंट मनी ट्रान्सफर सिस्टीम, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसशी (यूपीआय) फोनपेच्या संबंधाचाही त्यांनी उल्लेख केला. आयपीओ लाँच करण्यापूर्वी बरीच प्रक्रिया अवलंबावी लागते," असं ते म्हणाले. 

वॉलमार्टच्या अधिकाऱ्यानं हे वक्तव्य अशा वेळी केले आहे जेव्हा गुगलनं फ्लिपकार्टमधील हिस्सा खरेदी करण्याची योजना जाहीर केली आहे. गुगलनं फ्लिपकार्टमध्ये एक छोटासा हिस्सा खरेदी करण्यासाठी सुमारे ३५ कोटी डॉलर्स (सुमारे २,९०० कोटी रुपये) गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 

फ्लिपकार्टचं मूल्यांकन 

अमेरिकेतील वॉलमार्टनं केलेल्या इक्विटी व्यवहारांच्या आधारे ३१ जानेवारी २०२४ पर्यंत फ्लिपकार्टचं मूल्य ३५ अब्ज डॉलर्स होतं. वॉलमार्टनं आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३.५ अब्ज डॉलर्स भरून फ्लिपकार्टमधील आपला हिस्सा १० टक्क्यांनी वाढवून ८५ टक्के केला होता. फ्लिपकार्टनं २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४,८४६ कोटी रुपयांचा तोटा आणि ५६,०१२.८ कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवलं, तर त्याचा खर्च ६०,८५८ कोटी रुपये होता. फोनपेच्या २०२३ या आर्थिक वर्षासाठी महसुलात ७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फोनपेनं व्यवसाय विस्तारावर भर दिला आहे. अशातच कंपनीने अनेक देशांमध्ये सेवा सुरू केली आहे.

टॅग्स :फ्लिपकार्टइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक