Join us

Post Officeने व्याजदर वाढवले! मुदतीपूर्वीच पैसे होणार दुप्पट; ५ लाखाचे १० लाख मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 2:56 PM

Post Office Scheme: पोस्टाच्या या योजनेत मॅच्युरिटीच्या ५ महिन्यांपूर्वीच पैसे दुप्पट होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. कसे? जाणून घ्या...

Post Office Scheme: अनेक दशकांपासून Post Office हे भारतीयांचे अढळ विश्वासाचे स्थान आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आताच्या घडीला उपलब्ध असून, कोट्यवधी देशवासी नानाविध योजनांचा लाभ घेत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान करते. Post Office अजूनही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. Post Office मध्ये तुमचे पैसेही सुरक्षित राहतात, यासोबतच तुम्हाला हमखास परतावाही मिळतो. Post Officeने आपल्या एका स्कीममधील व्याजदर वाढवले असून, आता मुदतीपूर्वीच पैसे दुप्पट होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. 

किसान विकास पत्र (KVP) ही सरकारी योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावाने चालवली जात आहे, ती आता पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी झाली आहे. केंद्र सरकारने किसान विकास पत्रावर मिळणारे व्याज १ एप्रिल २०२३ पासून वार्षिक ७.२ टक्क्यांवरून ७.५ टक्के केले आहे. म्हणजेच आता मॅच्युरिटी कालावधी ५ महिन्यांनी कमी झाला आहे. पूर्वी जिथे या योजनेत पैसे दुप्पट करण्यासाठी १२० महिने लागायचे, आता तुमची गुंतवणूक केवळ ११५ महिन्यांत दुप्पट होऊ शकते. एखाद्या व्यक्तीने ५ लाख रुपये गुंतवले असतील तर त्या व्यक्तीला दुप्पट पैसे मॅच्युरिटीच्या वेळेस मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. 

किमान गुंतवणूक १००० रुपये, कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही

किसान विकास पत्र सरकारने जारी केलेली एक वेळची गुंतवणूक योजना आहे, जिथे तुमचे पैसे एका निश्चित कालावधीत दुप्पट होऊ शकतात. किसान विकास पत्र देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये किमान गुंतवणूक मर्यादा १००० रुपये आहे. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. ही योजना शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली असून, शेतकरी दीर्घकालीन आधारावर त्यांचे पैसे वाचवू शकतील. KVP कडे १००० रुपये, ५००० रुपये, १०,००० रुपये आणि ५०,००० रुपयांपर्यंतची प्रमाणपत्रे आहेत, जी खरेदी केली जाऊ शकतात.

दरम्यान, किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. सिंगल अकाऊंट व्यतिरिक्त जॉइंट अकाऊंटची सुविधा आहे. तसेच ही योजना अल्पवयीन मुलांसाठी उपलब्ध आहे. हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजेच HUF किंवा NRI व्यतिरिक्त इतर ट्रस्टसाठी ही योजना लागू असल्याचे सांगितले जाते. KVP मध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कमावलेल्या नफ्याच्या रकमेवर कर भरावा मिळतो, तर इतर योजना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि PPF खात्यावर मिळणारे व्याज करमुक्त असते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सीअंतर्गत दिलेली सूट या योजनेला लागू होत नाही, असे सांगितले जाते. 

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक