Post Office RD : गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैशांची नाही तर आर्थिक नियोजनाची आवश्यकता असते. सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जिथे तुम्ही अगदी थेंबाथेंबातून तळ निर्माण करण्यापर्यंत जाऊ शकता. केंद्र सरकारची अशीच एक योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही दरमहा फक्त १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. आज पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या आवर्ती ठेव (RD) योजनेबद्दल जाणून घेऊ. यालाच राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव योजनाही म्हणतात. या योजनेत सुरक्षित गुंतवणूक करुन खात्रीशीर परतावा मिळवू शकता.
कोण करू शकतो गुंतवणूक?इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार, पोस्ट ऑफिसच्या या आरडी स्कीममध्ये कोणताही प्रौढ व्यक्ती आपले खाते उघडू शकतो. याशिवाय ३ लोक संयुक्त खातेही उघडू शकतात. जर कोणी अल्पवयीन असेल तर पालक त्याच्या वतीने पैसे गुंतवू शकतात. अॅबनॉर्मल व्यक्तीच्या वतीने त्याचे पालक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. १० वर्षांपेक्षा जास्त वयाचा अल्पवयीन मुलंही RD योजनेत स्वतःच्या नावाने खाते चालवू शकतात. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत एकापेक्षा जास्त खाते उघडण्यावर कोणतीही मर्यादा नाही.
फक्त १०० रुपयांनी गुंतवणूक सुरूतुम्ही नॅशनल सेव्हिंग रिकरिंग डिपॉझिट खात्यात दर महिन्याला फक्त १०० रुपये जमा करू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही १० च्या पटीत कितीही पैसे गुंतवू शकता. खाते रोखीने किंवा चेकने उघडता येते. चेकच्या बाबतीत, जमा करण्याची तारीख ही चेकच्या प्रक्रियेची तारीख असावी लागते. जर कॅलेंडर महिन्याच्या १५ तारखेला तुम्ही खाते उघडले तर त्यानंतरच्या ठेवींची गणना महिन्याच्या १५ तारखेपर्यंत केली जाईल. तसेच, कॅलेंडर महिन्याच्या १६ व्या आणि शेवटच्या कामकाजाच्या दिवसाच्या दरम्यान खाते उघडल्यास, त्यानंतरच्या ठेवी महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत मोजल्या जातात.
व्याजदर आणि कर्ज सुविधापोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ५ वर्षांच्या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खात्यात जमा केलेल्या रकमेवर सध्या ६.७ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही १२ हप्ते जमा केले आणि खाते एका वर्षासाठी सक्रिय ठेवले. तर तुम्हाला जमा केलेल्या शिल्लक रकमेच्या ५०% पर्यंत कर्जाची सुविधा देखील घेऊ शकतात. कर्जाची परतफेड एकरकमी किंवा समान मासिक हप्त्यांमध्ये केली जाऊ शकते. RD खात्यावर २% + RD व्याज दर लागू असलेला दर कर्जासाठी लागू होईल.