Join us

PPF आणि SSY खातेधारकांनी ३१ मार्चपूर्वी करून घ्या हे काम, अन्यथा बंद होऊ शकतो अकाऊंट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 2:09 PM

पुढील महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. नवीन आर्थिक वर्षाच्या आधी तुम्हाला नक्कीच काही कामं पूर्ण करावी लागतील.

मार्च महिना सुरू होऊन आता काही दिवस गेले आहेत. हा महिना २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना आहे. त्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. नवीन आर्थिक वर्षाच्या आधी तुम्हाला नक्कीच काही कामं पूर्ण करावी लागतील. जर तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्यात किमान रक्कम ३१ मार्चपर्यंत जमा करा, अन्यथा तुमचं खाते बंद (निष्क्रिय) होऊ शकतं. तुम्ही बंद केलेलं खातं नंतर पुन्हा सुरू करू शकता, परंतु यासाठी तुम्हाला अनावश्यक दंड भरावा लागेल. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण झालेलं बरं. 

चालू आर्थिक वर्षासाठी पीपीएफ, सुकन्या समृद्धी आणि एनपीएस खात्यांमध्ये किमान रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ आहे. त्याचा संबंध कर आकारणीशीही आहे. वास्तविक, सरकारनं नवीन कर प्रणाली अधिक आकर्षक केली आहे. या अंतर्गत १ एप्रिल २०२३ पासून आयकर स्लॅबमध्ये बदल करून बेसिक एक्झम्पशन लिमिट २.५ लाख रुपयांवरून ३ लाख रुपये करण्यात आली आहे. नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शनचाही समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे, ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही कर दायित्व नाही. 

जमा करावी लागेल किमान रक्कम  

जे लोक आधीपासूनच पीपीएफ, सुकन्या समृद्धी आणि एनपीएस सारख्या कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत त्यांनी कदाचित नवीन कर प्रणालीकडे स्विच केलं असेल किंवा ते करण्याची योजना आखली असेल. तसं असल्यास, त्यांना या योजनांमधील गुंतवणुकीवर कर लाभ मिळू शकणार नाहीत. अशा लोकांना असंही वाटू शकतं की त्यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची किंवा डिपॉझिट करण्याची गरज नाही. दरम्यान, या खात्यांमध्ये किमान रक्कम जमा न केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. दंड टाळण्यासाठी, प्रत्येक योजनेसाठी किमान किती रक्कम जमा करावी लागेल हे जाणून घेऊ. 

किती रुपये भरावे लागतील? 

SSY योजनेसाठी प्रत्येक आर्थिक वर्षात किमान २५० रुपये जमा करण्याची गरज आहे. किमान रक्कम जमा न केल्यास, खातं डीफॉल्ट खातं मानलं जातं. खातं पुन्हा सुरू करण्यासाठी डीफॉल्टच्या प्रत्येक वर्षासाठी ५० रुपये डीफॉल्ट शुल्क भरावं लागेल. हे प्रत्येक वर्षाच्या डिफॉल्टसाठी किमान २५० रुपयांच्या योगदानासह भरावं लागेल. 

पीपीएफसाठी किती रक्कम भरावी लागते? 

PPF नियम २०१९ नुसार, प्रत्येक आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात किमान ५०० रुपये जमा करणं आवश्यक आहे. किमान रक्कम जमा न केल्यास, पीपीएफ खातं निष्क्रिय होतं. खातं पुन्हा सुरू करण्यासाठी, प्रत्येक वर्षासाठी ५० रुपये डीफॉल्ट फी वार्षिक किमान रक्कम ५०० रुपयांसह भरावी लागेल. 

NPS खात्यात किती रक्कम आवश्यक? 

गुंतवणूकदारांना प्रत्येक आर्थिक वर्षात त्यांच्या एनपीएस खात्यात किमान १,००० रुपये जमा करावे लागतात. ही किमान रक्कम जमा न केल्यास खातं गोठवलं जातं. फ्रीझ खातं सक्रिय करण्यासाठी एकरकमी किमान ५०० रुपये योगदान दिलं जाऊ शकते. खातं सक्रिय ठेवण्यासाठी प्रति आर्थिक वर्षात किमान १ हजार रुपये योगदान आवश्यक आहे.

टॅग्स :पीपीएफगुंतवणूक