सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करता येते आणि चांगली रक्कम जमा करता येते. सध्या यावर सरकार ७.१ टक्के व्याज देत आहे. पीपीएफ खातं कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडता येतं. कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. याशिवाय आयकर कलम 80C अंतर्गत या योजनेत कर लाभ देखील उपलब्ध आहे. परंतु तरीही, पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही नियमांची माहिती असणं आवश्यक आहे, ज्याकडे बरेचदा लोक लक्षही देत नाहीत.
एकापेक्षा अधिक खाती उघडता येत नाहीत
सर्व योजनांमध्ये एकापेक्षा जास्त खाती उघडण्याची सुविधा आहे, परंतु पीपीएफमध्ये व्यक्ती एकापेक्षा जास्त खाती उघडू शकत नाही. जर दोन पीपीएफ खाती चुकून उघडली गेली असतील तर दुसरं खातं वैध खातं मानलं जाणार नाही. दोन्ही खाती एकत्र केल्याशिवाय त्यावर व्याज मिळणार नाही.
जॉईंट अकाऊंटचा पर्याय नाही
इतर अनेक योजनांमध्ये तुम्हाला संयुक्त खातं उघडण्याची सुविधा मिळते, परंतु पीपीएफमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. तुम्ही निश्चितपणे यात नॉमिनी ठरवू शकता. खातेदाराचा कोणत्याही कारणानं मृत्यू झाल्यास ती रक्कम काढण्याचा अधिकार नॉमिनीला आहे.
व्याजदर बदलण्याची शक्यता
पीपीएफच्या व्याजदराबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा व्याजदरही वेळेनुसार बदलत असतो. एप्रिल २०१९ ते जून २०१९ पर्यंत त्याचा व्याजदर ८ टक्के होता, त्यानंतर तो ७.९ टक्के आणि नंतर जानेवारी-मार्च २०२० मध्ये तो ७.१ टक्के करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत हा व्याजदर ७.१ टक्के इतकाच राहिला आहे. येत्या काळात जर हा व्याजदर आणखी कमी झाला तर लोकांकडे अनेक पर्याय उपलब्ध होतील ज्याद्वारे चांगला परतावा मिळू शकेल.
गुंतवणूकीची मर्यादा
पीपीएफमध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा वार्षिक १.५ लाख रुपये आहे. जर तुमचा पगार चांगला असेल आणि तुम्हाला या योजनेत अधिक गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तसं करू शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला गुंतवणुकीचे इतर पर्याय शोधावे लागतील.