Join us

PPF की SIP...कशातून मिळेल अधिक नफा?; सुरक्षा अन् जोखीमही जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 6:19 AM

दोन्ही योजना दीर्घकालीन आहेत. पीपीएफ ही सरकारी योजना आहे. यात तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात

नवी दिल्ली : नियमितपणे बचत केलेले पैसे वाढवायचे असतील, तर दीर्घकालीन गुंतवणुकीचे अनेक पर्यात उपलब्ध आहेत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) तसेच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी) हे दोन्ही पर्याय दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले पर्याय आहेत. परिपक्व होताच कोणत्या योजनेत परतावा अधिक आहे तसेच सुरक्षा आणि जोखीम कोणत्या योजनेत अधिक आहे,  हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

योजना दीर्घकालीन

दोन्ही योजना दीर्घकालीन आहेत. पीपीएफ ही सरकारी योजना आहे. यात तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात. यातून मिळणाऱ्या परताव्याची शाश्वती असते. एसआयपीद्वारे म्चुच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. बाजारात होणाऱ्या चढउतारानुसार मिळणाऱ्या परताव्यावर परिणाम होऊ शकतो. 

एसआयपी : कितीही पैसे गुंतवा, जोखीम अधिकएसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. एसआयपी गुंतवणुकीची सुरुवात १०० रुपयांनी करता येते. यात कमाल गुंतवणूक किती करावी, यासाठी कोणताही मर्यादा नाही. परिपक्वतेचा कालावधी योजनेनुसार भिन्न असतो. एसआयपीतून मिळणारा परतावा निश्चित नसला तरी या गुंतवणुकीतून सरासरी १२ टक्के परतावा मिळतोच.

पीपीएफ : गुंतवणुकीची मर्यादा, खात्रीचा परतावा पीपीएफमध्ये ५०० रुपयांत खाते उघडता येते. वर्षाला कमाल दीड लाख रुपये यात गुंतविता येतात. गुंतवणूक परिपक्व होण्यासाठी किमान १५ वर्षांचा अवधी दिला जातो. यात ७.१ टक्के दराने व्याज दिले जाते. जमा रकमेवर चक्रवाढव्याजाचा फायदा दिला जातो. आयकरात सूटही मिळते. 

कशातून होतो अधिक फायदा?

गुंतवणूकदाराने पीपीएफ तसेच एसआयपी योजनेत दर महिन्याला पाच-पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली तर दोन्ही खात्यावर १५ वर्षांनी प्रत्येकी नऊ लाख रुपये जमा होतील. ७.१% पीपीएफमध्ये दराने गुंतवणूकदाराला ७,२७,२८४ रुपयांचे व्याज मिळू शकेल. परिपक्वतेनंतर संपूर्ण रक्कम १६,२७,२८४ रुपये इतकी होईल. १२% एसआयपीमध्ये या दराने १५ वर्षानंतर एकूण १६,२२,८८० रुपयांचे व्याज मिळेल. मॅच्युरिटीनंतर एकूण २५,२२,८८० रुपये मिळतील.

टॅग्स :गुंतवणूक