PPF Vs VPF: शेअर मार्केटमध्ये पाण्यासारखा पैसा असला तरी जोखीमही तितकीच आहे. प्रत्येकजण अशी जोखीम पत्करुन आयुष्यभराची कमाई डावावर लावू शकत नाही. अशा लोकांसाठी अनेक गुंतवणूक योजना सध्या उपलब्ध आहेत. ज्या खात्रीशीर आणि चांगला परतावा देतात. या योजना फक्त चांगला परतावाच नाही तर तुम्हाला आयकरात सलवतही मिळते. यामध्ये आज आपण २ लोकप्रिय करबचत योजनांची माहिती घेणार आहोत. PPF आणि VPF या दोन्ही योजनांबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. मात्र, याच्यातील फरक तुम्हाला माहिती आहे का? कुठली योजना तुमच्यासाठी फायदेशीर आहे?
पीपीएफ म्हणजे काय?
PPF म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, भारत सरकातर्फे चालवल्या जाणाऱ्या या योजनेत गॅरंटीड परताव्यासह आयकरातही सलवत मिळते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ एक उत्तम योजना आहे. सेवानिवृत्ती नियोजन, मुलांचे शिक्षण आणि घरबांधणीसाठी या योजनेचा चांगला फायदा होतो. या योजनेचा लॉक इन परियड १५ वर्षांचा आहे.
वीपीएफ म्हणजे काय?
स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधी (VPF) हे कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) निर्धारित केलेल्या किमान योगदानापेक्षा तुम्ही जास्त रक्कम गुंतवू शकता. वास्तविक, कर्मचाऱ्याने कितीही योगदान दिले तरी कंपनी मूळ पगाराच्या १२% पेक्षा जास्त योगदान देत नाही. अनेक कर्मचारी VPF चा पर्याय निवडतात. कारण त्यांना इतर कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही. हा पर्याय सोपा आहे. कारण गुंतवणुकीची रक्कम त्यांच्या पगारातून थेट कापली जाते.
दोघांमधील फरक
PPF या योजनेत कुणीही गुंतवणूक करू शकतो. तर VPF फक्त EPF अंतर्गत समाविष्ट असलेल्या पगारदार व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. PPF चा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा असतो, तर VPF रोजगार कालावधीशी जोडलेला असतो. त्याचप्रमाणे, सध्या PPF मधील गुंतवणुकीवर ७.१% व्याजदर दिला जात आहे, तर VPF मध्ये ८.२५% व्याज दिले जात आहे. दोन्हीमध्ये कर बचतीचे पर्याय उपलब्ध आहेत. पीपीएफमध्ये तुम्ही वार्षिक १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. PPF मध्ये, ७ वर्षांनी आंशिक पैसे काढता येतात, तर VPF मध्ये, ५व्या वर्षानंतर आंशिक पैसे काढता येतात. PPF जोखीममुक्त आहे तर VPF ही कमी जोखीम असलेली सरकार-समर्थित EPF योजना आहे.
तुमच्यासाठी कोणती योजना चांगली?
या प्रश्नाचे उत्तर तुमच्या आर्थिक नियोजनात आहे. तुम्हाला दीर्घकालीन स्थिरता आणि खात्रीशीर परतावा हवा असेल तर PPF हा एक उत्तम पर्याय आहे. याचा लॉक-इन कालावधी मोठा असला तरी गुंतवणुकीची शिस्त तुम्हाला आर्थिक स्थैर्य देण्यास मदत करते. सेवानिवृत्ती किंवा इतर दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी एक विश्वासार्ह निधी म्हणून तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल. PPF पेक्षा जास्त परतावा तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी VPF कधीही बेस्ट योजना आहे. तुमच्या पगाराचा महत्त्वपूर्ण भाग सेवानिवृत्तीच्या बचतीसाठी तुम्ही या योजनेत गुंतवू शकता.