Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: केंद्र सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक नागरिकाला व्हावा, हा हेतू असतो. यातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, केंद्राच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा उद्देश विशेषत: वंचितांना आर्थिक सेवा प्रदान करण्याचा आहे.
त्या म्हणाल्या की, पीएमजेजेबीवाय (PMJJBY) आणि पीएमएसबीवाय (PMSBY) सह तीन सामाजिक सुरक्षा योजना वंचितांना आर्थिक अनिश्चिततेपासून संरक्षण देतात. या तीन सामाजिक सुरक्षा (जन सुरक्षा) योजनांमध्ये- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMJJBY) आणि अटल पेन्शन योजना (APY) आहेत. या योजना 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आल्या होत्या.
आर्थिक सेवा पुरविण्याचे उद्दिष्ट
तिन्ही योजना देशातील नागरिकांच्या भल्यासाठी आहेत, ज्या अनपेक्षित घटना आणि आर्थिक अनिश्चिततेच्या वेळी सुरक्षा प्रदान करतात. जन सुरक्षा योजनेच्या 8 व्या वर्धापनदिनानिमित्त अर्थमंत्र्यांनी सांगितले की, या योजनांचा उद्देश वंचितांना अत्यावश्यक आर्थिक सेवा प्रदान करणे आहे. तीन योजनांच्या आकडेवारीचा उल्लेख करून, सीतारामन म्हणाल्या की, 26 एप्रिल 2023 पर्यंत PMJJBY अंतर्गत 16.2 कोटी, PMSBY अंतर्गत 34.2 कोटी आणि APY अंतर्गत 5.2 कोटी नावनोंदणी करण्यात आली आहे.
6.64 लाख कुटुंबांना महत्त्वाची मदत
पीएमजेजेबीवाय बाबत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, या योजनेने 6.64 लाख कुटुंबांना महत्त्वपूर्ण मदत दिली आहे. त्यांना एकूण 13,290 कोटी रुपये देण्यात आले. PMSBY अंतर्गत 1.15 लाखांहून अधिक कुटुंबांना 2,302 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. PMJJBY आणि PMSBY साठी दावा प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.