Emcure Pharma IPO: नमिता थापर यांच्या वडिलांनी सुरू केलेली कंपनी एमक्योर फार्मास्युटिकल्सचा आयपीओ ३ जुलै रोजी खुला होणार आहे. या ऑफरचा प्राइस बँड ९६० ते १००८ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलाय. हा आयपीओ ५ जुलै रोजी बंद होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांना २ जुलै रोजी बोली लावता येईल. आयपीओ बंद झाल्यानंतर एमक्योर फार्माचे शेअर्स १० जुलै रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होऊ शकतात. कंपनीच्या आयपीओमध्ये ८०० कोटी रुपयांचे शेअर्स नव्यानं जारी केलं जाणार आहेत. तर ११५१ कोटी रुपयांच्या सुमारे १.१४ कोटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) मिळणार आहे.
ओएफएसमध्ये प्रवर्तक सतीश रमणलाल मेहता, सुनील रजनीकांत मेहता, नमिता विकास थापर आणि समित सतीश मेहता हे शेअर्स विक्रीसाठी ठेवणार आहेत. याशिवाय पुष्पा रजनीकांत मेहता, भावना सतीश मेहता, कामिनी सुनील मेहता, बीसी इन्व्हेस्टमेंट IV, अरुणकुमार पुरुषोत्तमलाल खन्ना, बुर्जिस मीनू देसाई आणि सोनाली संजय मेहता हे देखील ऑफर फॉर सेलमध्ये आपले शेअर्स विकणार आहेत. नमिता विकास थापर लोकप्रिय बिझनेस रिअॅलिटी शो 'शॉर्ट-टॅक इंडिया'च्या शार्क देखील आहे.
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे याचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर लिंक इंटाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड याचे रजिस्ट्रार आहेत.
Emcure Pharma IPO रिझर्व्ह हिस्सा
एमक्योर फार्माने आयपीओमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी १,०८,९०० इक्विटी शेअर्स राखीव ठेवले आहेत. हे शेअर्स कर्मचाऱ्यांना अंतिम इश्यू प्राइसमध्ये सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. याशिवाय आयपीओचा अर्धा भाग म्हणजे ५० टक्के हिस्सा क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी (क्यूआयबी), ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि १५ टक्के नॉन इन्स्टिट्युशन इनव्हेस्टर्ससाठी (एनआयआय) राखीव ठेवण्यात आला आहे.
कुठे होणार पैशांचा वापर?
एमक्योर फार्माची भारत, युरोप आणि कॅनडामध्ये मजबूत उपस्थिती आहे. आयपीओमध्ये नवे शेअर्स जारी करून उभारलेल्या रकमेपैकी ६०० कोटी रुपये कंपनी कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. मार्च २०२४ अखेर बॅलन्स शीटमध्ये २,०९१.९ कोटी रुपयांचं कर्ज होतं. कर्ज फेडल्यानंतरची उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाईल.