property buying tips : गावाकडून शहरात आलेल्या प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर असावं असं वाटतं. मात्र, घरांच्या किमती दिवसेंदिवस आवाक्याबाहेर चालल्या आहेत. तुम्ही जर नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या पत्नीच्या नावे घर खरेदी करुन लाभ मिळवू शकता. महिलांचा समाजात सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या नावावर अनेक योजना राबवत असते. अनेक गोष्टींमध्ये महिलांना पुरुषांच्या तुलनेत सवलत मिळत आहेत.
सरकारने महिलांसाठी मालमत्ता खरेदी करण्यासाठी अनेक नियम केले आहेत. महिलांना मालमत्ता करात विशेष सूट देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही स्वतःसाठी घर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते तुमच्या पत्नीच्या नावावर खरेदी करू शकता ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.
व्याजदरात सवलत
तुम्ही गृहकर्ज काढून मालमत्ता खरेदी करत असाल तर तुमच्या पत्नीच्या नावावरच खरेदी करणे चांगले आहे. कारण, भारतात अनेक बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या आहेत, ज्या महिलांना पुरुषांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देतात. तुम्ही या सवलतीचा लाभ घेऊ शकता.
मुद्रांक शुल्कात सूट
नवीन घराची खरेदी करताना खरेदीखत तयार करावे लागते. यासाठी अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. तुम्हाला घराची नोंदणी करावी लागते. यासाठी तुम्ही मुद्रांक शुल्क भरता. घराच्या किमतीनुसार, तुम्हाला भरभक्कम स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. पण भारतात अशी अनेक राज्ये आहेत जिथे महिलांना पुरुषांपेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरावे लागते.
मालमत्ता कर सूट
महिलांना मालमत्ता संबंधित करातही सूट मिळते. काही महापालिकेने महिलांना ही सूट दिली आहे. जेव्हा मालमत्ता महिलेच्या नावावर असेल तेव्हाच तुम्हाला कर लाभ मिळतो.
पत्नीची आर्थिक सुरक्षा आणि स्वावलंबन
जर एखाद्या महिलेच्या नावावर मालमत्ता असेल तर त्यामुळे तिची आर्थिक सुरक्षाही मजबूत होते आणि ती स्वावलंबी बनते. त्यामुळे ती पूर्ण स्वातंत्र्याने कोणताही निर्णय घेऊ शकते. शिवाय पत्नीच्या नावावर घर खरेदी केल्यानंतर पत्नीही तुमच्यावर नक्कीच खुश होईल.