Join us  

मुंबईत नोकरदारांचा पगार कोण खातंय? इथं १५ लाख कमावणाराही ठरतोय गरीब; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 12:26 PM

Property in Mumbai : मुंबईत पाण्यासारखा पैसा असला तरी तिथं होणारा खर्चही खूप आहे. या महानगरात वार्षित १५ लाख रुपये कमावणा व्यक्तीही गरीब मानला जातो.

Property in Mumbai : आर्थिक राजधानी, मायानगरी, मुंबापुरी, चित्रनगरी, स्वप्न नगरी अशी कित्येक नावं या शहराला आहेत. येथे देशभरातील बडे उद्योगपती, सेलिब्रिटींपासून हातांवर पोट असलेलेही लोक एकत्र नांदतात. या शहरात येणारा कुणीही उपाशी मरत नाही हे विशेष. इथं पाण्यासारखा पैसा वाहतो, तो मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे, असंही म्हटलं जातं. देशातील प्रत्येक राज्यातील लोक या शहरात पाहायला मिळतात. मुंबईत भरपूर पैसा आहे, हे जरी सत्य असलं तरी इथं खर्चही त्यात प्रमाणात होतो. दिवसेंदिवस घरांच्या किमती गगनाला भिडत असल्याने सामान्य माणसाला इथे राहणे अवघड होत चालले आहे. घर घेणे विसरा, या शहरात भाड्याने राहणे ही मोठी गोष्ट आहे.

घरभाड्याच्या बाबतीत देशातील सर्वात महागड्या शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक लागतो. CREDAI-MCHI च्या वार्षिक अहवालानुसार, मुंबईतील घरांसाठी सरासरी वार्षिक भाडे १ BHK अपार्टमेंटसाठी ५.१८ लाखांपर्यंत आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे एका चांगल्या कंपनीतील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक ५ लाख रुपये हे वार्षिक पॅकेज आहे. मुंबईतील वाढत्या भाड्याच्या किमतींमुळे नोकरदार आणि हुशार लोकांचे स्थलांतर होऊ शकते. कारण या व्यावसायिकांना बचत आणि आर्थिक स्थैर्यासाठी परवडणाऱ्या शहरांमध्ये जाण्यावाचून गत्यंतर राहणार नाही, असं अहवालात म्हटले आहे.

मुंबईच्या तुलनेत, बेंगळुरू आणि दिल्ली-NCR मधील १BHK अपार्टमेंटसाठी सरासरी वार्षिक भाड्याची किंमत जवळपास निम्मी आहे. येथे अनुक्रमे हा खर्च २.३२ लाख आणि २.२९ लाख रुपये आहे. बंगळुरू आणि दिल्लीतील कर्मचाऱ्यांचे सरासरी वार्षिक वेतन अनुक्रमे ५.२७ लाख आणि ४.२९ लाख आहे, असे अहवालात म्हटले आहे. अशा परिस्थितीत येथे राहणे स्वस्त आहे. पण नोकरी करणाऱ्यांना मुंबईत राहणे खूप महागडे आहे. अहवालानुसार, मध्यम-स्तरीय कर्मचारी, सहसा २ BHK अपार्टमेंट भाड्याने घेतात. त्यांचे वार्षिक पॅकेज सरासरी १५.०७ लाख रुपये आहे. त्यापैकी मुंबईत भाड्यावर दरवर्षी त्यांचा सरासरी ७.५ लाख रुपये खर्च होतात.

पुणे सर्वात राहण्यायोग्यकाही दिवसांपूर्वीच पुणे देशातील सर्वात राहण्यायोग्य शहर मानले गेले होते. मुंबईच्या तुलनेत पुणे खूपच स्वस्त आहे. इथे बंगळुरू आणि दिल्लीपेक्षाही स्वस्तात भाड्याने घरे मिळतात. येथे भाड्यावर सरासरी १ ते २ लाख वार्षिक खर्च येऊ शकतो. पुण्यात काही भागात नक्कीच घरभाडे जास्त आहे. मात्र, सरासरी पाहिलं तर इतर शहरांच्या तुलनेत ते खूप स्वस्त पडत आहे.

प्रॉपर्टीच्या बाबतीत मुंबई सर्वात महागअहवालानुसार, निवासी रिअल इस्टेट प्रकल्पांसाठी मुंबईचा प्रीमियम दिल्ली-एनसीआरपेक्षा २५ पट, हैदराबादपेक्षा ५० पट, बेंगळुरूपेक्षा ४७ पट आणि चेन्नई व पुण्यापेक्षा ९ पट जास्त आहे. मुंबईतील विकासक १ चौरस मीटर विकसित करण्यासाठी मंजूरी खर्च म्हणून ५४,२२१ रुपये हप्ता भरतो. दिल्ली एनसीआरमध्ये हा रेट केवळ २ हजार १६६ रुपये आहे. तर हा हप्ता चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये १ हजार ०७१ रुपये आहे. 

टॅग्स :मुंबईमहागाईपुणेगुंतवणूक