Bank Of India Special FD : आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी योग्य गुंतवणूक करणे फार महत्त्वाचे आहे. सध्या बाजारात शेअर मार्केट, म्युच्युअल फंड चांगला परतावा देतात. मात्र, या सर्व योजना जोखीमपूर्ण आहे. तुम्हाला जर सुरक्षित गुंतवणुकीचा चांगला पर्याय हवा असेल तर योग्य बातमी वाचत आहात. दसरा आणि दिवाळी या सणांच्या आधी बँका आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर देत आहेत. या मालिकेत बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष एफडी योजना सुरू केली आहे, ज्यावर चांगला परतावा मिळत आहे.
एफडीवर सर्वाधिक व्याजदर
बँक ऑफ इंडिया ४०० दिवसांत परिपक्व होणाऱ्या या विशेष एफडी योजनेवर सर्वाधिक ८.१० टक्के व्याजदर देत आहे. या मुदत ठेव योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहक देशातील कोणत्याही शाखेत जाऊन गुंतवणूक करू शकतात. याशिवाय, डिजिटल चॅनेल (BOI ओम्नी निओ ॲप/इंटरनेट बँकिंग) द्वारे देखील गुंतवणूक केली जाऊ शकते. एफडीचे दर २७ सप्टेंबर 2024 पासून लागू झाले आहेत.
किती मिळणार व्याजदर?
या विशेष FD योजनेअंतर्गत तुम्ही ३ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी गुंतवणूक करू शकता. बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी FD योजनेवर ८.१० टक्के व्याजदर देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.९५ टक्के व्याजदर देत आहे. सामान्य नागरिकांसाठी हा व्याजदर ७.४५% इतका आहे. भारतात राहणारे लोक, NRI, NRO दे देखील या मुदत ठेवीचा लाभ घेऊ शकतात.
"देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सणासुदीची भेट म्हणून ही योजना आणली आहे. ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी अतिशय आकर्षक व्याजदरावर ही ४०० दिवसांसाठीची मुदतठेव योजना असणार आहे." असे बँकेने आपल्या निवदेनात म्हटले आहे.
गुंतवणुकीत वैविध्य महत्त्वाचं
'सर्व अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नका' असा सल्ला दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी दिला आहे. गुंतवणुकीचं नियोजन करताना या गोष्टीची नेहमी काळजी घ्या. जेणेकरुन भविष्यात कुठल्याही आर्थिक अडचणींना तोंड देणे सोपे होईल. अल्पमुदतीसाठी मुदत ठेव योजना सर्वात सुरक्षित आणि योग्य मानली जाते. जर तुम्हाला दीर्घ गुंतवणुकीतून मोठा फंड उभा करायचा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडांचा विचार करू शकता.