Join us  

साॅव्हरिन गोल्ड बाॅण्डमध्ये विक्रमी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 6:39 AM

यंदाच्या पहिल्या मालिकेत ७.७७ टनांची खरेदी, विक्रमी किमतीनेही केले आकर्षित

नवी दिल्ली : सॉव्हरिन गोल्ड बाॅण्डची (एसजीबी) यंदाची पहिली मालिका जूनमध्ये जारी झाली होती. या मालिकेने विक्रीचे सर्व विक्रम मोडले आहेत. आतापर्यंत ७७.६९ लाख युनिटची (१ युनिट = १ ग्रॅम) विक्री झाली. म्हणजेच आभासी पद्धतीने लोकांनी ७.७७ टन सोन्यांत गुंतवणूक केली आहे. या मालिकेत सोन्याची किंमत ५,९२६ रुपये प्रतिग्रॅम आहे.

किमतीच्या दृष्टीने पाहता ४,६०४ काेटी रुपयांचे सुवर्ण रोखे विकले गेले आहेत. २०२०-२१ आर्थिक वर्षात पाचव्या मालिकेत सुवर्ण राेख्यांची सर्वाधिक ६३.५ लाख युनिट विक्री झाली होती. 

११० टन आतापर्यंत  सोन्याची विक्री

सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड योजना २०१५-१६ मध्ये सुरू झाली. आतापर्यंत ६४ मालिकांतून ११.०४ कोटी युनिट म्हणजेच ११० टन सोने विकले गेले आहे.२०१५ मध्ये पहिल्या हप्त्यापासून आतापर्यंत सुवर्ण रोख्याच्या विक्रीतून सरकारला मिळणारा निधी १८ पट वाढला आहे.

काय आहे सॉव्हरिन गोल्ड बाॅण्ड? हा एक सरकारी बाॅण्ड आहे. तो डीमॅटच्या स्वरूपात परिवर्तित केला जाऊ शकतो. ५ ग्रॅम सोन्याचा बाॅण्ड असेल; तर ५ ग्रॅम सोन्याच्या किमतीएवढीच बाॅण्डची किंमत असते. हे बाॅण्ड रिझर्व्ह बँक जारी करते.

सॉव्हरिन गोल्ड बाॅण्डमध्ये २४ कॅरेट म्हणजेच ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्यात गुंतवणूक केली जाते. 

ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा पद्धतीने ही गुंतवणूक करता येते. त्यावर २.५० टक्के वार्षिक व्याज मिळते.

१२५-१५० टक्के मिळू शकतो परतावापहिल्या तीन मालिकांत सुवर्ण रोख्यांचा भाव २६००-२९०० रुपये प्रतिग्रॅम होता. केडिया ॲडव्हायजरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, यंदा सोने ६,५०० रुपये प्रतिग्रॅमपर्यंत चढू शकते. त्यामुळे ४५ लाख गुंतवणूकदारांना १२५-१५० टक्के परतावा मिळू शकतो. वार्षिक २.५ टक्के व्याजही यात मिळते.

 

 

टॅग्स :सोनंइन्कम टॅक्सव्यवसाय