तुम्ही नोकरी करताय का आणि तुमच्या रिटायरमेंटची काळजी आहे का? रिटायरमेंट नंतर तुम्ही आर्थिकदृष्ट्या कसे सक्षम व्हाल याचा विचार केला आहे का? बरेच लोक रिटायरमेंटसाठी आधीच चांगलं नियोजन करतात. पण आधी तुमच्यासाठी कोणती स्कीम चांगली ठरू शकते हे जाणून घेतलं पाहिजे. नोकरीच्या सुरुवातीपासूनच रिटायरमेंटसाठी थोडी थोडी गुंतवणूक केलेली कधीही उत्तम. जेणेकरून वृद्धापकाळात तुम्ही खूप मोठी रक्कम जमा करू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फॉर्म्युला घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या निवृत्तीच्या वेळी पाच कोटी रुपये जमा करू शकता.
काय आहे ४४२ फॉर्म्युला?
ज्यांनी नुकतीच नोकरीची सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला बेस्ट ठरू शकतो. तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करत आहात असे समजू. म्हणजेच, तुम्ही तुमच्या पगारातून दररोज ४४२ रुपये वाचवा आणि एनपीएसमध्ये गुंतवणूक करा. म्हणजेच एका महिन्यात तुम्हाला १३,२६० रुपये गुंतवावे लागतील.
तुम्हाला सलग ३५ वर्षे दरमहा १३,२६० रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत सतत गुंतवणूक करत असाल, तर निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे व्याजासह सुमारे पाच कोटी रुपये जमा झाले असतील. समजा तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर १० टक्के व्याज मिळत आहे, तर चक्रवाढ व्याजाप्रमाणे तुमचे पैसेही वाढतील.
मिळणार कम्पाऊंडिंगचा फायदा
३५ वर्षे सातत्यानं गुंतवणूक केल्यानंतर, तुमची एकूण गुंतवणूक केलेली रक्कम ५६,७०,२०० रुपये होईल. तुमची ५६,७०,२०० रुपयांची ही रक्कम कम्पाऊंडिंगसह पाच कोटींपेक्षा जास्त रक्कम बनेल. म्हणजेच पाच कोटींपैकी तुम्हाला ४.५५ कोटी रुपये व्याज म्हणून मिळतील. जेव्हा एनपीएस वयाच्या ६० वर्षानंतर मॅच्युअर होते, तेव्हा तुम्ही फक्त ६० टक्के रक्कम काढू शकता. यामध्ये तुम्हाला 3 कोटी रुपये मिळतील. यानंतर, उर्वरित दोन कोटी रुपये अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवून, तुम्हाला संपूर्ण आयुष्यासाठी निश्चित रक्कम मिळू शकते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)