Wealth Of Rich Indians : देशातील करोडपतींच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच वर्षांत 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चने(Centrum Institutional Research) आपल्या एका अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, वार्षिक 5 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या 49 टक्क्यांनी वाढून 58,200 झाली आहे.
31,800 व्यक्तींची कमाई 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चचा हा अहवाल एएनआयच्या हवाल्याने समोर आला आहे. या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत वार्षिक 10 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या 63 टक्क्यांनी वाढली आहे. या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, देशात 31,800 लोक आहेत जे वार्षिक 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावत आहेत आणि 2018-19 ते 2023 या आर्थिक वर्षात, म्हणजेच गेल्या पाच वर्षांत यात मोठी वाढ झाली आहे.
10 लाख लोकांची कमाई 50 लाखांच्या वर वार्षिक 50 लाखांपेक्षा जास्त कमावणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली असून, वार्षिक 50 लाखांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांच्या श्रेणीत सुमारे 10 लाख लोक येतात. अहवालानुसार, 2018-19 ते 2023-24 या आर्थिक वर्षात वार्षिक 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या 121 टक्क्यांनी वाढली आहे आणि अशा लोकांची एकूण संपत्ती 38 लाख कोटींवर पोहोचली आहे.
तर, वार्षिक 5 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या लोकांची संख्या 106 टक्क्यांनी वाढली आहे. या श्रेणीत येणाऱ्या लोकांची एकूण संपत्ती 40 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसेच, वार्षिक 50 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या लोकांच्या संख्येत 64 टक्क्यांनी वाढ झाली असून पाच वर्षांत त्यांची संपत्ती 49 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.