Join us  

Reliance चे तिमाही निकाल जाहीर; महसूल ₹ 257,823 कोटी तर नफा ₹ 17448 कोटी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 9:19 PM

RIL Q1 Results Update: आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत रिलायन्सच्या निव्वळ नफ्यात 4 टक्क्यांनी घट झाली आहे.

Reliance Q1 Results : देशातील सर्वात मोठी खाजगी कंपनी Reliance Industries ने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. पहिल्या तिमाहीत कंपनीला रु. 257,823 कोटी महसूल मिळाला, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीपेक्षा 11.1 टक्के अधिक आहे. 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत 231,132 कोटी रुपये महसूल मिळाला होता. तर, पहिल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 4 टक्क्यांनी घट होऊन रु. 17,448 कोटींवर आला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 18,182 कोटी होता. 

रिलायन्सच्या निकालांबद्दल कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, या तिमाहीत रिलायन्सची ऑपरेटिंग आणि आर्थिक कामगिरी तिच्या विविध व्यवसायांच्या पोर्टफोलिओची ताकद दर्शवते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे व्यवसाय भारताच्या विकासासोबत वस्तू आणि सेवांच्या डिजिटल आणि भौतिक वितरणासाठी ऊर्जावान चॅनेल उपलब्ध करून देत आहेत.

दरम्यान, पहिल्या तिमाहीत Jio Platforms चा महसूल 12.8 टक्क्यांच्या वाढीसह 34,548 कोटी रुपये झाला, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 30,640 कोटी रुपये होता. पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 5698 कोटी रुपये आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 5101 कोटी रुपये होता. कंपनीने सांगितले की, त्यांची ग्राहक संख्या 490 मिलियनपर्यंत वाढली आहे, त्यापैकी 130 मिलियन 5G युजर्स आहेत. विशेष म्हणजे, Jio हा चीनबाहेरचा सर्वात मोठा 5G ऑपरेटर आहे.

समूहातील रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) चा महसूल 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 75,615 कोटी रुपये राहिला, जो गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत 69,948 कोटी रुपये होता. महसुलात 8.1 टक्के वाढ झाली आहे. तर, कंपनीचा नफा 2549 कोटी रुपये आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 2436 कोटी रुपये होता.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीव्यवसायगुंतवणूक