कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत त्या देशातील नोकरदार वर्गाचे योगदान मोठं असतं. यामुळेच जगातील सर्व देश आपल्या कर्मचाऱ्यांना चांगलं वातावरण देण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात. भारत सरकारही आपल्या देशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी खूप गंभीर आहे. भारत सरकारचं कामगार आणि रोजगार मंत्रालय (Ministry of Labour and Employment) कर्मचाऱ्यांचं कामकाज पाहतं. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेऊन 'समाधान पोर्टल' (Samadhan Portal) सुरू केलं आहे. कोणत्याही नोकरदार व्यक्तीला नोकरीशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तो या समाधान पोर्टलवर आपली तक्रार नोंदवू शकतो.
सर्व कर्मचार्यांच्या नोकरीशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक समाधान पोर्टल तयार करण्यात आल्याची माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयानं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली होती. कर्मचारी मोकळेपणाने आणि सहजतेने तक्रार नोंदवू शकतो. समाधान पोर्टलच्या माध्यमातून कर्मचारी घरी बसून त्यांच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवू शकतात, असंही त्यात नमूद करण्यात आलंय.
अशा प्रकरणांत तक्रारजर एखाद्या कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीनं किंवा कोणतीही सूचना न देता कामावरून काढून टाकले असेल तर पगारात कपात केली जाते किंवा बोनस संबंधित समस्या येतात, शिवाय मेटर्निटी बेनिफिट, औद्योगिक वाद, ग्रॅच्युइटी इत्यादी विरोधात पोर्टलवर कंपनीविरुद्ध तक्रार दाखल करू शकतात.
अनेक प्रकारे करू शकता तक्रारकर्मचार्यांना नोकरीशी संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. समाधान पोर्टलच्या वेबसाइटवर https://samadhan.labour.gov.in/ वर भेट देऊन कर्मचारी त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. याशिवाय उमंग मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता. जर एखादी व्यक्ती स्वतः तक्रार नोंदवू शकत नसेल, तर ती त्याच्या जवळच्या CSC केंद्रावर म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन कंपनीविरुद्ध तक्रार दाखल करू शकतो. कर्मचाऱ्याने नोंदवलेल्या तक्रारीवर भारत सरकार थेट कारवाई करते.