सामान्यतः लोकांना पारंपारिक मुदत ठेवींमध्ये (FDs) गुंतवणूक करणं अधिक सुरक्षित आणि सोपे वाटते. मुदत ठेवी हा जोखीममुक्त निश्चित उत्पन्नाचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक बँकांमध्ये 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत बँक एफडी सुविधा उपलब्ध आहे.
बँकांव्यतिरिक्त पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्येही मुदत ठेव सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेवी ठेवता येतात. जर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही बँक एफडी किंवा पोस्ट ऑफिस मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करू शकता. 5 वर्षांच्या कालावधीसाठी 5 लाख रुपयांच्या ठेवींवर SBI आणि पोस्ट ऑफिसमध्ये किती व्याज उत्पन्न मिळतं हे पाहू.
एसबीआयमध्ये 5 लाखांवर किती व्याज
सामान्य ग्राहकांना SBI मध्ये 5 वर्षांच्या FD वर 6.50 टक्के व्याज मिळत आहे. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 7.50 टक्के व्याज देत आहे. जर आपण आता 5 लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर सामान्य ग्राहकाला 6,90,210 रुपये मिळतील. यामध्ये व्याजातून 1,90,210 रुपये उत्पन्न मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना 7,24974 रुपये मिळतील. यामध्ये व्याजातून मिळणारे उत्पन्न 2,24,974 रुपये असेल. SBI चे हे व्याजदर 2 कोटींपेक्षा कमी ठेवींसाठी असून ते 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू करण्यात आलेत.
पोस्ट ऑफिसमध्ये किती व्याज
पोस्ट ऑफिसमध्ये 1 एप्रिल 2023 पासून सर्व ग्राहकांना 5 वर्षांच्या FD वर 7.5 टक्के व्याज मिळत आहे. आता 5 लाख रुपये जमा केल्यावर, ग्राहकाला मॅच्युरिटीवर 7,24,974 रुपये मिळतील. यामध्ये व्याजातून 2,24,974 रुपये मिळतील.
टॅक्स डिडटक्शनचा फायदा
एसबीआय एफडी किंवा पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिटमध्ये 5 वर्षांच्या एफडीवर कर कपातीचा लाभ उपलब्ध आहे. आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. एफडीमध्ये मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम करपात्र असते.