Join us  

​​​​​​​दिवाळीपूर्वीच SBI नं दिली आनंदाची बातमी, डिपॉझिटवरील व्याज दरात केली मोठी वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 10:18 PM

आता बँकेत ठेवीच्या स्वरूपात पैसे ठेवल्यास ग्राहकांना अधिक व्याज मिळणार आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने दिवाळीपूर्वीच आपल्या ठेवीदारांना आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. अर्थात आता बँकेत ठेवीच्या स्वरूपात पैसे ठेवल्यास ग्राहकांना अधिक व्याज मिळणार आहे. याचा सर्वाधिक फायदा, जे लोक ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर अवलंबून आहेत त्यांना होईल.

आता किती झाला व्याज दर - SBI ने मुदत ठेवींच्या दरांमध्ये कमाल 80 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. हे दर 22 ऑक्टोबरपासून लागू होतील. महत्वाचे म्हणजे, हे नवे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या ठेवींवर लागू असतील. SBI ने 211 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवरील व्याजदरात 80 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. आत्तापर्यंत, ग्राहकांना 4.70% व्याज मिळत होते, जे आता 22 ऑक्टोबरपासून 5.50% पर्यंत वाढेल.

याशिवाय, बँकेने 180 दिवसांपासून ते 210 दिवसांपर्यंत परिपक्व होणाऱ्या FD वरील व्याजदर सध्याच्या 4.65% च्या तुलनेत 60 बेसीस पॉइंट्सची वाढ केली आहे. तसेच, 2 वर्षांपासून ते 3 वर्षांपेक्षा कमी अवधीसाठीही अशाच प्रकारची वाढ करण्यात आली आहे. या अवधीचा व्याज दर सध्याच्या 5.65% वरून 6.25% करण्यात आला आहे.

46 दिवसांपासून ते 179 दिवसांच्या अवधीवरील व्याज दर 50 बेसिस पॉइंटने वाढवून 4.50% करण्यात आला आहे. तसेच, 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमीच्या अवधीसाठी सध्याचा व्याजदर 5.60% टक्क्यांवरून वाढवून 6.10% करण्यात आला आहे. एसबीआयने 7 दिवस ते 45 दिवसांच्या अवधीतील व्याज दर 3% वर स्थिर ठेवण्यात आला आहे. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :एसबीआयबँकगुंतवणूक