SBI Annuity Deposit Scheme: देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयमध्ये टर्म डिपॉझिट व्यतिरिक्त ग्राहकांना अनेक स्पेशल डिपॉझिट स्कीममध्ये पैसे जमा करून व्याज मिळवण्याची सुविधाही मिळते. यापैकीच एक योजना म्हणजे एसबीआय अॅन्युइटी डिपॉझिट (SBI annuity deposit scheme) स्कीम. या योजनेची खासियत म्हणजे यात एकरकमी डिपॉझिट ठेवावं लागतं, त्यानंतर तुम्हाला दरमहा व्याजासह उत्पन्नाची हमी मिळते. या योजनेत ग्राहकाला मूळ रकमेसह दरमहा व्याज दिलं जातं. हे व्याज खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर दर तिमाहीला कंपाउंडिंगवर मोजलं जातं. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, ठेवीवरील व्याज हे बँकेच्या टर्म डिपॉझिटवर म्हणजेच एफडीइतकंच आहे.
किती वेळासाठी डिपॉझिट करायचं?
एसबीआयच्या वेबसाइटनुसार, या योजनेत ग्राहकाला एकरकमी डिपॉझिट करावं लागतं आणि त्यानंतर मूळ रक्कम आणि व्याज मासिक हप्ते म्हणून मिळतं. या योजनेत ३६, ६०, ८४ किंवा १२० महिन्यांसाठी एकरकमी डिपॉझिट करता येतं. जास्तीत जास्त ठेवीची कोणतीही मर्यादा नाही. तर, किमान अॅन्युइटी महिन्याला १००० रुपये इतकी आहे. एसबीआयच्या कोणत्याही शाखेतून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
केव्हा मिळतात पैसे?
एसबीआयच्या या योजनेत डिपॉझिटच्या पुढील महिन्याच्या देय तारखेपासून अॅन्युइटी दिली जाईल. जर ती तारीख एका महिन्यात (२९, ३० आणि ३१) नसेल तर पुढील महिन्याच्या १ तारखेला अॅन्युइटी दिली जाईल. टीडीएस कापून लिंक्ड सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाऊंटमध्ये जमा केल्यानंतर अॅन्युइटी क्रेडिट केली जाते. एसबीआय अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये नियमित ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर मिळणारे व्याज मिळते. यामध्ये नॉमिनेशनची सुविधाही उपलब्ध आहे. ग्राहकांना युनिव्हर्सल पासबुकही देण्यात येतं. तसंच एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरणाची सुविधा आहे.
योजनेवर लोनचीही सुविधा
एसबीआय अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये गरजेनुसार अॅन्युईटीच्या शिल्लक रकमेच्या ७५% पर्यंत ओव्हरड्राफ्ट/लोन मिळू शकते. लोन/ओव्हरड्राफ्ट घेतल्यानंतर अॅन्युइटी पेमेंट लोन खात्यात जमा होईल. त्याचबरोबर ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास ही स्कीम वेळेआधीच बंद केली जाऊ शकते. याशिवाय १५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठीही टाइम प्रीपेमेंट करता येणार आहे. त्याचबरोबर प्री-मॅच्युअर दंडही एफडीप्रमाणेच भरावा लागणार आहे. म्हणजेच एफडी प्रमाणेच या योजनेत प्री-मॅच्युअर पेनल्टी असते. भारतीय रहिवासी हे खाते उघडू शकतात. अल्पवयीन मुलांसाठीही ही सुविधा उपलब्ध आहे. हे खातं सिंगल किंवा जॉइंट अशा दोन्ही पद्धतीनं उघडता येतं.