Share Market Business News : गेल्या वर्षी(2023) जगभरातील शेअर बाजारांमध्ये वाढ दिसून आली. यामध्ये टेक स्टॉक्सची सर्वात मोठी भूमिका होती. मात्र या नवीन वर्षात टेक स्टॉकची सुरुवात चांगली झाली नाही. अमेरिकेतील मॅग्निफिसेंट सेव्हन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात कंपन्यांचे शेअर्स सलग चार दिवसांपासून घसरत आहेत. यामध्ये Apple, Amazon, Alphabet Inc., Microsoft, Meta Platforms, Tesla Inc. आणि Nvidia Corporation यांचा समावेश आहे.
गेल्या चार दिवसांत जगातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या Apple चे शेअर्स 4.6% ने घसरले आहेत. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये या कालावधीत $383 अब्जची घट झाली आहे, जी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीपेक्षा दीड पट जास्त आहे. मस्क यांची एकूण संपत्ती $220 अब्ज आहे.
मस्क यांची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाचे शेअर्स गेल्या चार दिवसांत 8.8 टक्क्यांनी घसरले आहेत. चौथ्या तिमाहीत कंपनीने अपेक्षेपेक्षा जास्त गाड्या विकल्या, पण या काळात कंपनीचा दबदवा कमी झाला. सर्वाधिक ईव्ही विकण्याच्या बाबतीत टेस्ला, चिनी कंपनी BYD च्या मागे पडली आहे. टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे मस्क यांची संपत्तीही घसरली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, त्यांची एकूण संपत्ती आता $220 अब्ज आहे. त्यांनी दोन दिवसांत $8.98 अब्ज गमावले आहेत. गेल्या वर्षी त्यांची एकूण संपत्ती सुमारे 92 अब्ज डॉलरने वाढली होती.
सध्या Apple $2.865 ट्रिलियनच्या मार्केट कॅपसह जगातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. मायक्रोसॉफ्ट $2.754 ट्रिलियनसह दुसऱ्या स्थानावर आहे. सौदी अरेबियाची सरकारी कंपनी सौदी अरामको $2.126 ट्रिलियनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. Google ची मूळ कंपनी अल्फाबेट ($1.746 ट्रिलियन) चौथ्या क्रमांकावर, Amazon ($1.534 ट्रिलियन) पाचव्या आणि Nvidia ($1.174 ट्रिलियन) सहाव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म ($885.23), बर्कशायर हॅथवे ($797.76) आणि टेस्ला ($758.01) यांचा क्रमांक लागतो.