तुम्हाला दररोज कुठे ना कुठे सेल लागलेला दिसत असेल. हा सेल तुम्हाला इतर कोठेही दिसणार नाही, पण ई-कॉमर्स वेबसाइटवर वर्षभर सेल सुरू असतो. या सेलमध्ये, अनेकदा क्रेडिट कार्डांवर ऑफर असतात. अधिकाधिक लोक वस्तू खरेदी करतील यासाठी अनेक वेळा Buy Now Pay Later ची सुविधाही दिली जाते. बाय नाऊ पे लेटर म्हणजे आधी वस्तू खरेदी करा आणि नंतर पैसे द्या. अशा परिस्थितीत, अनेकांना असं वाटते की क्रेडिट कार्डद्वारे वस्तू खरेदी करण्याऐवजी, जर त्यांनी बाय नाऊ पे लेटर या सुविधेचा लाभ घेतला तर क्रेडिट कार्ड लिमिट ब्लॉक होणार नाही. इथे एक मोठा प्रश्न उद्भवतो की क्रेडिट कार्डनं खरेदी करणं चांगलं आहे की बाय नाऊ पे लेटरनं? जाणून घेऊ.
यात काय आहेत समानता?
तुम्ही क्रेडीट कार्डद्वारे वस्तू खरेदी करा किंवा बाय नाऊ पे लेटरद्वारे, दोन्हींमध्ये तुम्हाला पेमेंट करण्यासाठी थोडा वेळ मिळेल. दोन्हीमध्ये, क्रेडिट मर्यादा निश्चित केलेली असते, त्यापलीकडे तुम्ही खरेदी करू शकत नाही. जर तुम्ही वेळेवर पैसे भरले नाही, तर तुम्हाला दोन्ही प्रकरणांमध्ये दंड भरावा लागेल.
काय आहे खासियत?
तुम्ही क्रेडिट कार्डनं ऑनलाइन शॉपिंग केल्यास तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळतात. काही क्रेडिट कार्ड कॅशबॅक देखील देतात. जर तुम्ही Buy Now Pay Later वापरत असाल तर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत.
तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे वस्तू विकत घेतल्यास, तुम्हाला पेमेंटसाठी ३०-५० दिवसांचा वेळ मिळतो, तर बाय नाऊ पे लेटर अंतर्गत, तुम्हाला ते बिल अनेक हप्त्यांमध्ये विभागून भरण्याची सुविधा मिळते. यासाठी वेगळं शुल्क नाही. परंतु, काहीवेळा क्रेडिट कार्डमध्येही नो कॉस्ट ईएमआय पर्याय उपलब्ध असतो.
कशावरुन खरेदी करावी?
ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एखादी वस्तू खरेदी करायची असेल, तर आधी क्रेडिट कार्डला महत्त्व द्यायला हवं. कारण त्यात तुम्हाला अधिक फायदे मिळतील. त्यात कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंट्स देखील उपलब्ध असतील. तुम्हाला हवं असल्यास, तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयची सुविधा देखील मिळेल. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल किंवा त्यामध्ये कोणतीही लिमिट शिल्लक नसेल, तर तुम्ही आता बाय नाऊ पे लेटर वापरू शकता.