नवी दिल्ली : भारतासह जगभरात औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे तसेच डॉलरमध्ये तेजी आली आहे. याशिवाय जागतिक मंदीची शक्यता आणि खाद्य वस्तूंची महागाई उच्च पातळीवर पोहोचल्यामुळे यंदा गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
चीनची अर्थव्यवस्था सुस्तावल्यामुळे चांदीची मागणी घसरली आहे. या सर्व कारणांमुळे चांदीच्या किमतीत यंदा १५ टक्के घसरण झाली आहे. चांदीचा भाव सध्या ५३ हजार ते ५६ हजार रुपये किलो यादरम्यान आहे. चांदीच्या भावातील ही घसरगुंडी गुंतवणुकीसाठी मात्र चांगली आहे, असे जाणकारांना वाटते.
यामुळे गुंतवणूक होऊ शकते फायदेशीर
जाणकारांच्या मते, सध्या चांदी दोन वर्षांच्या नीचांकावर आहे. महागाई कमी होऊन औद्योगिक उत्पादन वाढल्यास चांदीची मागणी वाढून भावही तेजीत येतील. अशा परिस्थितीत चांदीमधील गुंतवणुकीतून जबरदस्त परतावा मिळेल. आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांनी सांगितले की, सध्या सोने आणि चांदी या दोन्ही धातूंसाठी वातावरण चांगले आहे. डॉलर जसजसा नरम होईल, तसतशा दोन्ही धातूंच्या किमती उसळतील.
चांदीची मागणी का वाढतेय?
महागाई कमी झाल्यामुळे गुंवणुकीसाठी सकारात्मक धारणा बनेल. इक्विटी बाजारात मूल्यांकन पुन्हा उच्च पातळीवर गेले आहे. घसरगुंडीच्या भीतीने गुंतवणूकदार सोने-चांदीकडे वळतील. जगभरातील देश ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी सोलर पॅनलवर लक्ष देत आहेत. सोलर पॅनलमध्ये चांदीचा वापर होतो. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. देशात ५जीची तयारीही जोरात सुरू आहे. या दोन्हींमुळे चांदीची मागणी वाढेल.
सोन्याची चमक पुन्हा उतरली, दर घसरले
मंगळवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात ३१४ रुपयांची घसरण होत ते ५०,९०५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे, तर चांदीच्या दरात ७६० रुपयांनी वाढ होत ती ५७,९७४ रुपयांवर पोहोचली आहे. देशभरात महागाई वाढल्याने लोकांनी खर्चाला आखडता हात घेतला असून, खरेदी मंदावली आहे. त्यामुळे देशात सोने आयातीमध्येही गेल्या काही महिन्यांत प्रचंड घट पाहायला मिळत आहे. ज्यावेळी शेअर बाजारांमध्ये घसरण होत असते त्यावेळी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक केली जाते. सध्या शेअर बाजारात वाढ होत असल्याचा परिणामही सोन्यातील गुंतवणुकीवर होत आहे.