Join us

वयाच्या 30व्या वर्षी सुरू करा गुंतवणूक अन् 45व्या वर्षी व्हा कोट्यधीश, जाणून घ्या हा फॉर्म्युला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 5:10 PM

कमी कालावधीत मोठा निधी जमवायचा असेल, तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे महत्वाचे आहे.

SIP Funds: कमी वेळेत मोठा निधी जमवायचा असेल, तर तुम्हाला योग्य ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल. जेवढी जास्त गुंतवणूक कराल, तेवढा मोठा परतावा तुम्हाला मिळेल. तुम्ही थोडी जोखीम घ्यायला तयार असाल, तर SIP गुंतवणुकीसाठी खूप चांगला पर्याय ठरू शकतो. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. या गुंतवणुकीतून तुम्ही कोट्यवधी रुपयांचा निधी जमवू शकता.

म्युच्युअल फंडात मिळणारा परतावा बाजारावर अवलंबून असतो. परंतु दीर्घ मुदतीत 15 आणि 20 टक्के परतावा मिळू शकतो. तर म्युच्युअल फंडाचा सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळतो. यामुळे तुमचे पैसे वेगाने वाढतात. विशेष म्हणजे, म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक करुन, तुम्ही 15 वर्षात कोट्यधीश होऊ शकता. समजा तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर तुम्ही वयाच्या 45 व्या वर्षी 1 कोटी रुपयांचे मालक होऊ शकता.

हा फॉर्म्युला तुम्हाला करोडपती बनवेल?15 वर्षांत कोट्यधीश होण्याचा फॉर्म्युला 15X15X15 अगदी सोपा आहे. या फॉर्म्युल्यानुसार, तुम्हाला 15 वर्षांसाठी SIP द्वारे म्युच्युअल फंडामध्ये दरमहा 15,000 रुपये गुंतवावे लागतील. म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला दीर्घकाळासाठी 15 टक्के किंवा त्याहून अधिक व्याज मिळेल. एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही 15 वर्षांसाठी दरमहा 15 हजार रुपये गुंतवले, तर तुम्ही एकूण 27,00,000 रुपये गुंतवाल. त्यावर 15 टक्के व्याज मिळाले तर 74,52,946 रुपये होतात. अशाप्रकारे, गुंतवलेली रक्कम अधिक व्याज मिळून 15 वर्षांत तुमच्याकडे रु. 1,01,52,946 चा निधी तयार केला होईल. तुमची मासिक कमाई 70-80 हजार रुपयांच्या आसपास असेल, तर तुमच्यासाठी 15 हजार रुपयांची गुंतवणूक फार मोठी गोष्ट नाही.

(टीप: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :गुंतवणूकव्यवसायपैसा