Join us

SIP vs RD: ५ वर्षांसाठी ₹५००० ची गुंतवणूक, कुठे मिळेल सर्वाधिक रिटर्न; कोणत्या ठिकाणी गुंतवणूक फायद्याची?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 8:41 AM

SIP vs RD: जर तुम्ही पुढील ५ वर्षांसाठी थोडी रक्कम गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पाहूया कोणत्या स्कीममध्ये मिळतोय सर्वाधिक परतावा.

SIP vs RD: जर तुम्ही पुढील ५ वर्षांसाठी थोडी रक्कम गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट आणि एसआयपी हेदेखील गुंतवणुकीसाठी दोन वेगवेगळे पर्याय आहेत. या दोन्ही योजनांमध्ये तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम गुंतवावी लागते. 

एकीकडे तुम्हाला आरडीमध्ये फिक्स्ड रिटर्न मिळतो आणि त्यात रिस्क नसते. तर दुसरीकडे एसआयपीमधील परतावा कधीच निश्चित नसतो आणि शेअर बाजाराचा धोकाही असतो. आज आपण जाणून घेणार आहोत की ५ वर्षांसाठी ५००० रुपये गुंतवल्यास अधिक परतावा कोठून मिळतो.

५ वर्षांच्या आरडीवर किती व्याज?

जर तुम्हाला आरडी खातं चालवायचं असेल तर देशात कोणतीही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खाते उघडता येतं. पोस्ट ऑफिस ५ वर्षांच्या आरडीवर वार्षिक ६.७ टक्के व्याज देत आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा ५००० रुपयांची आरडी केली तर ५ वर्षात तुमची एकूण गुंतवणूक ३,००,००० रुपये होईल. ६.७ टक्के व्याजदरानुसार ५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण ३,५६,८३० रुपये निश्चित रक्कम मिळेल. यात ५६ हजार ८३० रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे.

एसआयपीमधून किती परतावा?

दुसरीकडे, जर तुम्ही ५ वर्षांसाठी ५००० रुपयांची एसआयपी करत असाल तर इथेही तुमची एकूण गुंतवणूक ३,००,००० रुपये होईल. जर तुम्हाला दरवर्षी अंदाजे १२ टक्के परतावा मिळाला तर ५ वर्षांनंतर तुम्ही एकूण ४,१२,४३२ रुपयांचा फंड तयार करू शकता. यात तुमच्या १,१२,४३२ रुपयांच्या परताव्याचा समावेश आहे. म्हणजेच एसआयपीमधील परतावा आरडीच्या जवळपास दुप्पट आहे. याशिवाय एसआयपीमध्ये कंपाउंडिंगचाही फायदा मिळतो.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजार