टाटा समूह (Tata Group) सातत्याने आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. याअंतर्गत टाटाने अनेक कंपन्यांना खरेदी केले आहे. यातच आता टाटा आणखी एका मोठ्या कंपनीला विकत घेत आहे. टाटा समूह लवकरच भारतात बाटलीबंद पाणी विकणारी दिग्गज कंपनी बिस्लेरी(Bisleri) खरेदी करणार आहे. यासाठी त्या कंपनीसोबत कराराची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. अंदाजे 6,000 ते 7,000 कोटी रुपयांमध्ये हा करार होऊ शकतो.
टाटा समूहाची तयारी सुरू
मीडिया रिपोर्टनुसार, टाटा समूहाची कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) भारतातील सर्वात मोठी पॅकेज्ड वॉटर कंपनी बिस्लेरीला अंदाजे 6,000-7,000 कोटी रुपयांना विकत घेईल. विशेष म्हणजे, बिस्लेरीचे प्रमुख असलेले रमेश चौहान(Ramesh Chauhan) यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बिस्लेरीमधील हिस्सा विकण्यासाठी टाटा समूहाशी बोलणी सुरू असल्याची पुष्टी केली होती.
सध्याचे व्यवस्थापन 2 वर्षे चालू राहील
या हा करार करण्यापूर्वी त्यांनी त्यांचे प्रसिद्ध ब्रँड थम्स अप(Thums up), गोल्ड स्पॉट(Gold Spot) आणि लिम्का (Limca) याचाही करार केला आहे. तीन दशकांपूर्वी त्यांनी कोका-कोलासोबत या ब्रँड्सचा करार पूर्ण केला होता. हे ब्रँड्स विकल्यानंतर रमेश चौहान आता आपला बाटलीबंद पाण्याचा ब्रँड बिस्लेरी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला विकणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कराराचा भाग म्हणून बिस्लेरीचे सध्याचे व्यवस्थापन दोन वर्षांसाठी सुरू राहील. हा करार करण्यामागे एक मोठे कारणही समोर आले आहे.
रमेश चौहान बिसलेरी का विकताहेत?
रिपोर्टनुसार, उद्योगपती रमेश चौहान आता 82 वर्षांचे आहेत आणि अलीकडच्या काळात त्यांची प्रकृतीही ठीक नसते. तसेच, बिस्लेरीला विस्ताराच्या पुढील स्तरावर नेण्यासाठी त्यांच्याकडे उत्तराधिकारी नाही. त्यांची मुलगी जयंती व्यवसायात फारशी उत्सुक नाही. हेच मोठे कारण आहे, ज्यामुळे ते टाटा समूहासोबत बिस्लेरीचा करार करत आहेत.