Sovereign Gold Bond: जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करण्याचा विचार करत असाल आणि ते स्वस्त होण्याची वाट पाहत असाल तर मग आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आम्ही सांगत आहोत. सरकारची सार्वभौम सुवर्ण रोखे योजना ६ मार्चपासून सुरू झाली आहे आणि त्याचा आज शेवटचा दिवस आहे. या अंतर्गत सरकार सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना सवलतीच्या दरात सोने विकत आहे. रिझर्व्ह बँकेने गोल्ड बॉण्ड्सची इश्यूची किंमत ५,६११ रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे.
६ मार्चपासून सुरू झाली योजना
सार्वभौम गोल्ड बाँड योजना 2022-23 (Sovereign Gold Bond) मालिकेचा चौथा हप्ता ६ मार्च २०२३ पासून सुरू झाला. या आर्थिक वर्षातील योजनेची ही शेवटची मालिका आहे. आज म्हणजेच १० मार्च संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, तुम्ही बाजार दरापेक्षा कमी किमतीत सोने खरेदी करून या योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकता. यापूर्वी, तिसरी मालिका गेल्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये सुरू झाली होती.
तुम्हाला मिळू शकते प्रति ग्रॅम ५० रुपये सूट
डिसेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या गोल्ड बाँड्सची इश्यू किंमत रिझर्व्ह बँकेने प्रति ग्रॅम ५,४०९ रुपये निश्चित केली होती. गोल्ड बाँडची इश्यू किंमत ९९९ शुद्धतेच्या सोन्यावर आधारित आहे. जरी रिझव्र्ह बँकेने गोल्ड बॉण्ड्सची इश्यू किंमत ५,६११ रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे, परंतु तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते फक्त ५,५६१ रुपये प्रति ग्रॅमने खरेदी करू शकता. ही सूट मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त ऑनलाइन पेमेंट करावे लागेल. ऑनलाइन पेमेंटवर सरकारकडून ५० रुपये प्रति ग्रॅमची सूटही दिली जात आहे.
गोल्ड बाँडचा लॉक-इन कालावधी
सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी करण्यासाठी रोख, डिमांड ड्राफ्ट किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट केले जाऊ शकते. सुवर्ण रोख्यांसाठी लॉक-इन कालावधी आठ वर्षांचा आहे. तथापि, पाचव्या वर्षी बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सार्वभौम सुवर्ण बाँड योजना ही सोन्यात गुंतवणुकीसाठी सरकारी योजना आहे. यामध्ये प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी डिजिटल सोने खरेदी करण्याची सुविधा आहे. सरकारने २०१५ मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गोल्ड बाँड्सवर दिलेला व्याज दर हा रोखे खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी देय असलेल्या प्रारंभिक गुंतवणूक रकमेवर वार्षिक २.५० टक्के आहे. व्याजाची रक्कम दर सहा महिन्यांनी गुंतवणूकदारांच्या खात्यात पोहोचते. रिझव्र्ह बँक अटी व शर्तींसह वेळोवेळी गोल्ड बाँड जारी करत असते. या सुवर्ण रोख्याला सरकारी हमी असते.
सोने खरेदीसाठी एक निश्चित मर्यादा
कोणताही गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात सार्वभौम गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजनेअंतर्गत जास्तीत जास्त ४ किलो सोने खरेदी करू शकतो. हिंदू एकत्र कुटुंब आणि ट्रस्टसाठी ही मर्यादा २० किलो इतकी निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही बँका (स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नामांकित पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त एक्सचेंजेस लिमिटेड यांच्यामार्फत सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी करू शकता.