Join us

स्मॉल सेव्हिंग स्कीम्ससाठी विशेष सुविधा सुरू, घरबसल्या तपासता येणार बॅलन्स; जाणून घ्या कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 2:08 PM

Small Savings Scheme : या सुविधेच्या मदतीने पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम्सचे (Post Office Saving Schemes) खातेदार कोठूनही त्यांच्या खात्याची संपूर्ण माहिती मिळवू शकतात.

लहान बचत योजनांच्या (Small Saving Schemes) ग्राहकांसाठी एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेच्या मदतीने पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम्सचे (Post Office Saving Schemes) खातेदार कोठूनही त्यांच्या खात्याची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा सक्रिय करण्याची गरज भासणार नाही, कारण लहान बचत योजनांचे ई-पासबुक (e-passbook) फीचर लाँच करण्यात आले आहे.

ई-पासबुक फीचरच्या मदतीने, लहान बचत योजनांतर्गत कोणताही खातेदार काही मिनिटांत आपला बॅलन्स तपासू शकतो. पोस्ट विभागाने 12 ऑक्टोबर 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, लोकांना सोपी सुविधा देण्यासाठी आणि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ही सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अधिसूचनेनुसार, कोणताही ग्राहक पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या लहान बचत योजनांअंतर्गत कधीही आणि कोठूनही आपल्या खात्याची संपूर्ण माहिती घेऊ शकतो. ई-पासबुक सुविधेअंतर्गत हे काम करता येईल. ई-पासबुकच्या सुविधेमध्ये प्रवेश करण्यासाठी, तुमच्याकडे खात्याशी लिंक केलेला नोंदणीकृत क्रमांक असणे आवश्यक आहे. या सुविधेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

ई-पासबुकद्वारे मिळणाऱ्या सुविधा...- या सुविधेच्या मदतीने तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता.- तुम्ही मिनी स्टेटमेंट देखील डाउनलोड करू शकता, जे पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाउनलोड केले जाईल. सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस बचत खाते आणि पीपीएफ योजनांसाठी मिनी स्टेटमेंट्स उपलब्ध असतील. भविष्यात इतर योजनांसाठीही ही सुविधा दिली जाईल. मिनी स्टेटमेंटमध्ये शेवटचे 10 व्यवहार असतील.- पूर्ण स्टेटमेंट जारी करण्याची सुविधा देखील आहे, ज्या अंतर्गत एका निर्धारित वेळेत स्टेटमेंट डाउनलोड केले जाऊ शकते.

ई-पासबुक : पीपीएफ, बचत खाते, सुकन्या समृद्धी खात्यातील बॅलन्स कसा तपासायचा?- सर्वात आधी ई-पासबुक लिंक indiapost.gov.in किंवा ippbonline.com वर जा.- आता मोबाईल नंबर, कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा आणि OTP टाका.- यानंतर, येथे दिलेल्या ई-पासबुकसह पर्याय निवडा.- आता तुम्हाला योजनेचा प्रकार, खाते क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा टाकावा लागेल. यानंतर पुढे जा वर क्लिक करा आणि OTP टाकून व्हेरिफाय करा.- यानंतर, तुम्ही बॅलन्सची माहिती, मिनी स्टेटमेंट, फुल स्टेटमेंटचा पर्याय निवडू शकता.

दरम्यान, ही सुविधा वापरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा मोबाईल क्रमांक एरर दाखवत असेल, तर तुम्ही संबंधित पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून ते दुरुस्त करून घेऊ शकता.

टॅग्स :पोस्ट ऑफिसपैसागुंतवणूक