Married Couple Plan: तुम्ही विवाहित जोडपे आहात आणि तुमचे सेवानिवृत्तीचे नियोजन (Retirement Planning) करत आहात का? जर तसं असेल तर मोदी सरकारची प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन ही अशी योजना आहे जी गुंतवणुकीवर सुरक्षिततेसह चांगला परतावा देऊ शकते. देशातील इनफॉर्मल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने काही वर्षांपूर्वी पेन्शन योजना (Pension Scheme) सुरू केली होती. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन सुरू केले. या योजनेअंतर्गत, विवाहित जोडप्याला दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतात, ज्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर वार्षिक 72,000 रुपये पेन्शन मिळेल.
असंघटित कामगार बहुतांश स्ट्रिट वेंडर्स, मीड डे मिल वर्कर्स, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, घरकाम करणारे, कपडे धुणारे, रिक्षाचालक, शेतमजूर, बांधकाम कामगार, विडी उत्पादक, दृकश्राव्य कामगार आणि इतर तत्सम व्यवसाय तसंच मासिक उत्पन्न 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी, तसंच 18-40 वर्षे या वयोगटातील लोक या योजनेसाठी पात्र आहेत. हे कामगार पेन्शन योजना (NPS), कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) योजना किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत येत नाहीत आणि ते कराच्या कक्षेत येत नाहीत.
विवाहित जोडपे 72,000 रुपये वार्षिक पेन्शन कसे मिळवू शकतात हे समजून घेण्यासाठी येथे एक सोपं गणित समजून घेऊ. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती 30 वर्षांची असल्यास, योजनेसाठी मासिक योगदान सुमारे 100 रुपये प्रति महिना असेल – अशा प्रकारे एका जोडप्याचे प्रति महिना योगदान 200 रुपये असेल. अशा प्रकारे, त्या जोडप्याचे वार्षिक योगदान 2,400 रुपये असेल. वयाच्या 60 वर्षांनंतर, जोडप्याला वार्षिक 72,000 रुपये पेन्शन म्हणून मिळतील.
काय आहेत विशेष बाबी?
पीएम एसवायएम अंतर्गत प्रत्येकाला 60 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर प्रति महिना 3 हजार रुपये किमान पेन्शन मिळेल. पेन्शन मिळवताना जर एकाद्याचा मृत्यू झाला असेल तरा लाभार्थींच्या पती किंवा पत्नीला पेन्शचे 50 टक्के कौटुंबिक पेन्शनच्या रुपात मिळतील. कौटुंबिक पेन्शन हे केवळ पती पत्नीसाठी लागू आहे.
कसा घ्याल लाभ?
यासाठी तुमच्याकडे एक मोबाईल फोन, सेव्हिंग अकाऊंट आणि आधार क्रमांक असणे अनिवार्य आहे. पात्र व्यक्ती जवळच्या सीएससीमध्ये जाऊन आणि सेल्फ सर्टिफिकेटच्या आधारावर आधार क्रमांक आणि बँक खात्याचा वापर करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
(टीप - या लेखात केवळ माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"