मुंबई - माझा पगार खूप कमी आहे, मी कोट्यधीश होऊ शकत नाही. १०-१२ हजार महिन्याला कमवणारा कोट्यधीश कसा बनू शकतो? बहुतांश लोकांना हाच प्रश्न असतो. परंतु प्रत्येकजण निवृत्तीनंतर आपल्याकडे मोठी रक्कम असावी अशी इच्छा बाळगतो. परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही गुंतवणुकीच्या योग्य मार्गावर चालत असाल. गुंतवणूक करण्यासाठी पहिलं पाऊल मोठ्या रक्कमेने उचलले पाहिजे याची गरज नाही.
तुम्ही दर महिन्याला नियमित आणि छोटी रक्कम गुंतवणूक करून मोठा फंड जमा करू शकता. कारण काही लोक गुंतवणुकीचा विषय आल्यास सॅलरी आणखी थोडी वाढू दे मग गुंतवणूक करू असं म्हणतात. परंतु ती वेळ कधी येत नाही. गुंतवणुकीची सुरुवात कशी करायची या विचारानेच अधिक जण गोंधळलेले दिसतात. त्यामुळे चांगले रिटर्न मिळवण्यासाठी कुठे पैसे गुंतवावेत हे जाणून घेऊया.
५०० रुपयांपासून गुंतवणूक करा
जर तुम्ही घर, गाडी, मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न यासाठी प्लॅन करत असाल तर केवळ ५०० रुपये गुंतवणूक करून लक्ष्य गाठू शकता. त्यासाठी तुम्हाला नियमितपणे दरवर्षी गुंतवणूक करावी लागेल. चांगल्या रिटर्नसाठी आर्थिक सल्लागार म्युच्युअल फंडात(Mutual Fund) गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणं सोप्पं असते. कुठल्याही वयात म्युच्युअल फंडात SIP सुरू करू शकतो. परंतु कमी वयात गुंतवणूक केल्याने लक्ष्य गाठणे सहज साध्य होते. म्युच्युअल फंडात SIP तीन प्रकारे गुंतवणुकीचे पर्याय आहेत.
प्रथम- म्युच्युअल फंड एजंटद्वारे.
दुसरे- ब्रोकरकडून ऑनलाइन ट्रेडिंग खाते उघडून SIP करा.
तिसरे- म्युच्युअल फंडाच्या थेट योजनांमध्ये गुंतवणूक करणे.
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे. याद्वारे गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळणे सोपे होते. एसआयपीद्वारे कोणत्याही वैविध्यपूर्ण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते.
जर तुम्हाला मोठा फंड हवा असेल तर तुम्हाला दर महिन्याला गुंतवणूक करत राहावे लागेल. याशिवाय उत्पन्न वाढीबरोबर गुंतवणुकीचे प्रमाणही वाढावे लागेल. उदाहरणार्थ, जर २५ वर्षांचा तरुण म्युच्युअल फंडात ५०० रुपयांची गुंतवणूक करू लागला, तर त्याला दर ६ महिन्यांनी किमान ५०० रुपयांनी गुंतवणूक वाढवावी लागेल. अशाप्रकारे, ५ वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या ३० व्या वर्षी, गुंतवणुकीची रक्कम दरमहा ५००० रुपये होईल, जेव्हा तुम्ही पहिल्या दोन वर्षांचा परतावा पाहाल, तेव्हा तुमचा गुंतवणुकीचा उत्साह वाढेल.
उदाहरणार्थ, जर एखाद्याने वयाच्या ३० व्या वर्षापासून पुढील ३० वर्षे म्युच्युअल फंडात दरमहा ५००० रुपये गुंतवले तर त्याला वयाच्या ६० व्या वर्षी १ कोटी ७६ लाख ४९ हजार ५६९ रुपये मिळतील. हा अंदाज दरमहा ५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर १२% व्याजाने केली गेली आहे. जर त्यावर १५ टक्के व्याज उपलब्ध असेल तर परतावा ३ कोटी ५० लाख ४९ हजार १०३ रुपये होईल. दुसरीकडे, व्याज जरी १० टक्के असले तरी ३० वर्षांनंतर दरमहा ५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर एकूण १ कोटी १३ लाख, ९६ हजार ६२७ रुपयांचा परतावा मिळेल.
आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या
तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन प्लॅन डोळ्यासमोर असेल तर म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी घाबरू नये. शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम तुमच्या पोर्टफोलिओवर दिसून येईल. पण हे शॉर्ट टर्म आहे. मात्र, काही म्युच्युअल फंडांनी अपेक्षित परतावा दिलेला नाही. लहान गुंतवणूकदारांसाठी फंड निवडणे हे सर्वात कठीण काम आहे. कारण योग्य फंड निवडण्यासाठी खूप संशोधन करावे लागते. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार करा. आर्थिक तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या. कारण म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"