Irfan Razack Success Story: इतिहासात अशा अनेक यशोगाथा उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला आयुष्यात प्रगती करण्यासाठी प्रेरणा देतात. आज आम्ही अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी अल्पावधीत मोठे यश तर मिळवलेच, शिवाय देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतही स्थान मिळवले. आम्ही ज्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ते देशातील सर्वात प्रतिष्ठित रिअल इस्टेट प्रकल्पांपैकी एक असलेल्या प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक इरफान रझाक आहेत.
इरफान रझाक यांची यशोगाथा खूपच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. आज त्यांचे नाव देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट व्यावसायिकांमध्ये घेतले जाते. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार त्यांच्याकडे एकूण 1.8 अब्ज डॉलर्स (15221 कोटी रुपये) ची संपत्ती आहे.
अशी केली सुरुवात
रझाक यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील रझाक सत्तार 1950 च्या दशकात बंगळुरुमध्ये कपड्यांचे आणि टेलरिंगचे छोटे दुकान चालवायचे. इरफानदेखील आपल्या वडिलांना दुकानाच्या कामात मदत करायचे. काही काळानंतर वडिलांनी प्रेस्टिज ग्रुपची स्थापना केली. याच प्रेस्टिज ग्रुपला इरफान रझाक यांनी एका नवीन उंचीवर नेले. कंपनीने आतापर्यंत 285 प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. सध्या त्यांचे रहिवासी, कमर्शिअल, रिटेल, हॉस्पिटॅलिटी यासह विविध क्षेत्रांमध्ये 54 प्रकल्प सुरू आहेत.
अनेक देशांमध्ये पसरलेला कंपनीचा व्यवसाय
रझाक यांच्या कंपनीचा व्यवसाय देशातील अनेक शहरांमध्ये पसरलेला आहे. 1990 मध्ये बंगळुरूमध्ये आपला दुसरा रिअल इस्टेट प्रकल्प विकल्यानंतर, प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट्सची उपस्थिती आज बंगळुरूच्या पलीकडे चेन्नई, कोची, कालिकत, हैदराबाद आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये विस्तारली आहे.
देशातील अब्जाधीशांमध्ये समाविष्ट
फोर्ब्सनुसार, इरफान रझाक यांची एकूण संपत्ती 1.8 अब्ज डॉलर (15221 कोटी रुपये) आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने 12,930 कोटी रुपयांची विक्री नोंदवली. फोर्ब्सच्या 2024 च्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत रझाक यांचाही समावेश आहे.