Sukanya Samriddhi Account Link with Pan & Aadhaar : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारनं सुकन्या समृद्धी योजनेची सुरूवात केली आहे. या योजने अंतर्गत मुलीच्या नावे खातं उघडून दरवर्षी एक निश्चित रक्कम जमा केली जाते. मॅच्युरिटीनंतर ती मुलीला मोठ्या व्याजासह परताव्याच्या स्वरूपात मिळते. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून देशात मोठ्या प्रमाणात लोक गुंतवणूक करतात. सरकारनं या योजनेतील गुंतवणूकदारांसाठी पॅन आणि आधार क्रमांक अनिवार्य केला आहे. ज्यांनी अद्याप सुकन्या खातं पॅन आणि आधारशी लिंक केलेलं नाही त्यांनी तसं करणं आवश्यक आहे, अन्यथा खाते गोठवण्याबरोबरच त्यांना इतर अनेक नुकसानांना सामोरे जावे लागू शकते.
सुकन्या समृद्धी योजना ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षण आणि लग्नासाठी खर्च वाचवण्यासाठी प्रोत्साहित करते. अर्थ मंत्रालयाने जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी सुकन्या आणि इतर लहान बचत योजनांवर व्याजदर जाहीर केले आहेत. जुलै-सप्टेंबर २०२३ या तिमाहीसाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजनेवर ८ टक्के व्याजदर निश्चित केला आहे.
अर्थमंत्रालयाच्या नोटिफिकेशननुसार गुंतवणूकीसाठी अकाऊंट सुरू करताना पॅन किंवा फॉर्म ६० जमा करणं आवश्यक आहे. जर अकाऊंट सुरू करतेवेळी पॅन दिलं गेलं नसेल तर यापैकी कोणत्याही एका प्रकरणी दोन महिन्यांच्या आत आधार नंबर द्यावा लागेल. ३१ मार्चनंतर सुकन्या समृद्धी खातं सुरू केलेल्या खातेधारकांना आधार आणि पॅन संबंधित पोस्ट ऑफिस कार्यालयात दाखल करावा लागेल. याची अखेरची तारीख सप्टेंबर २०२३ आहे.
अकाऊंट फ्रीज होण्याचा धोकानोटिफिकेशननुसार गुंतवणूकदाराच्या खात्यात जर कोणत्याही वेळी अकाऊंटमध्ये जमा रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा अधिक असली किंवा कोणत्याही आर्थिक वर्षात एक लाखापेक्षा जास्त रुपये जमा असतील किंवा कोणत्याही महिन्यात अकाऊंटमध्ये जमा केली जाणारी रक्कम जर १० हजारांपेक्षा अधिक असेल, अशात जर पॅन दोन महिन्यांच्या आत दिलं गेलं नाही तर, नंबर उपलब्ध करून देईपर्यंत अकाऊंट फ्रीज केला जाईल.