Lokmat Money >गुंतवणूक > SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या

SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या

SSY Vs SIP Investment : जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी गुंतवणुकीची योजना आखत असाल आणि मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना किंवा म्युच्युअल फंड यापैकी कोणता चांगला पर्याय आहे, याबद्दल संभ्रमात असाल तर तुम्हाला याचं उत्तर इथे मिळू शकेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 12:37 PM2024-05-10T12:37:20+5:302024-05-10T12:38:38+5:30

SSY Vs SIP Investment : जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी गुंतवणुकीची योजना आखत असाल आणि मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना किंवा म्युच्युअल फंड यापैकी कोणता चांगला पर्याय आहे, याबद्दल संभ्रमात असाल तर तुम्हाला याचं उत्तर इथे मिळू शकेल.

sukanya Samriddhi or SIP Which Scheme Will Accumulate More Money for Your Daughter find out investment tips | SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या

SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या

SSY Vs SIP: मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सरकार सुकन्या समृद्धी योजनेच्या (Sukanya Samriddhi Yojana) नावानं एक योजना चालवते. या योजनेवर ८.२ टक्के दराने व्याज मिळतं. जर तुमच्या मुलीचं वय १० वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही तिच्या नावानं या योजनेत गुंतवणूक करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेत कमीत कमी २५० आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात. या योजनेत १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते आणि २१ वर्षांनंतर ही योजना मॅच्युअर होते. खात्रीशीर परताव्यावर अवलंबून असलेल्या पालकांसाठी ही एक चांगली योजना आहे.
 

पण जर चांगला परतावा मिळवणं हे तुमचं प्राधान्य असेल आणि त्यासाठी तुम्ही यासाठी जोखीमही घ्यायला तयार असाल तर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावानं म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून दीर्घ काळासाठी मोठी रक्कम जमा करू शकता. एसएसवाय आणि एसआयपीमध्ये कोणती योजना तुमच्यासाठी चांगली ठरू शकते हे कॅलक्युलेशनवरून जाणून घेऊ.
 

५००० रुपये मंथली डिपॉझिटवर SSY परतावा
 

सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ५ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास वर्षभरात ६० हजार आणि १५ वर्षांत ९ लाख रुपयांची गुंतवणूक होईल. यानंतर पालकांना या योजनेत गुंतवणूक करावी लागणार नसून ती रक्कम लॉक ठेवण्यात येईल. ही योजना २१ वर्षांनंतर मॅच्युअर होणार आहे. सध्याच्या ८.२ टक्के व्याजदरानुसार या गुंतवणुकीवर १८,७१,०३१ रुपये व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला २७,७१,०३१ रुपये मिळतील.
 

एसआयपीमधून किती परतावा?
 

जर तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात दरमहा ५००० रुपये गुंतवले तर १५ वर्षात तुम्ही इथेही ९ लाख रुपयांची गुंतवणूक कराल. एसआयपीवरील सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो. कधी कधी यापेक्षा जास्त परतावाही मिळतो. अशा तऱ्हेने १२ टक्क्यांनुसार हिशोब केल्यास १५ वर्षांत ९ लाखांच्या गुंतवणुकीवर १६ लाख २२ हजार ८८० रुपयांचे व्याज मिळेल. जर तुम्ही १५ वर्षांच्या आत ही रक्कम काढली तर तुम्हाला २५,२२,८८० रुपये मिळतील. ही रक्कम २१ वर्षांत सुकन्या समृद्धीवर मिळालेल्या परताव्याच्या जवळपास आहे.
 

दुसरीकडे जर तुम्ही ही गुंतवणूक १ वर्ष अधिक सुरू ठेवली म्हणजेच १५ ऐवजी १६ वर्षे गुंतवणूक केली तर १२ टक्के दरानं तुम्हाला २९,०६,८९१ रुपये मिळतील, जे सुकन्या समृद्धी योजनेच्या परताव्यापेक्षा खूप जास्त आहे. जर तुम्ही सलग २१ वर्षे ही गुंतवणूक सुरू ठेवली तर १२ टक्के दरानं एसआयपीच्या माध्यमातून ५६,९३,३७१ रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते, तर तुमची गुंतवणूक एकूण १२,६०,००० रुपये असेल. म्हणजेच केवळ गुंतवणुकीवर व्याज म्हणून तुम्हाला ४४,३३,३७१ रुपये मिळतील.
 

सुकन्या समृद्धी वि. एसआयपी
 

सुकन्या समृद्धीचा एक फायदा म्हणजे तुम्ही तीन प्रकारे टॅक्स बेनिफिट घेऊ शकता. ही योजना ईईई श्रेणीत येते. यामध्ये दरवर्षी जमा होणाऱ्या रकमेवर कर आकारला जात नाही, याशिवाय दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जात नाही आणि मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी संपूर्ण रक्कमही करमुक्त असते म्हणजेच गुंतवणूक, व्याज/परतावा आणि मॅच्युरिटीमध्ये कराची बचत होते. पण एसआयपीमध्ये तुम्हाला करात सूट मिळत नाही.
 

याशिवाय सुकन्या समृद्धीमध्ये परतावा निश्चित आहे, पण एसआयपी बाजाराशी निगडित असल्यानं खात्रीशीर परतावा मिळत नाही. मात्र, दीर्घ काळासाठी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जर तुमची मुलगी १० वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तरच तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. पण वयाचा एसआयपीशी काहीही संबंध नाही, तुम्ही मुलीसाठी गुंतवणूक करू शकता.

 

(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: sukanya Samriddhi or SIP Which Scheme Will Accumulate More Money for Your Daughter find out investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.