Join us  

सुकन्या समृद्धी, पीपीएफसह अल्पबचत बचत योजनांचे बदलले नियम; जाणून घ्या काय आहे अपडेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 8:55 AM

अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं २१ ऑगस्ट २०२४ रोजी एक नवीन परिपत्रक जारी केलं आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होणार नवे बदल.

राष्ट्रीय अल्पबचत योजनेअंतर्गत अनियमितपणे उघडलेली खाती पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून नियमित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी नवं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं २१ ऑगस्ट २०२४ रोजी हे परिपत्रक जारी केलं आहे. त्यात हे बदल जाहीर करण्यात आले आहेत. अल्पबचत योजनांच्या काही लोकप्रिय योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ, एनपीएस, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न, किसान विकास पत्र, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, रिकरिंग डिपॉझिट स्कीम इत्यादींचा समावेश आहे. हे नवे बदल १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होतील.

इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, बदलासाठी सहा श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. यात विसंगत एनएसएस खाती, अल्पवयीन मुलांच्या नावानं उघडलेली पीपीएफ खाती, एनआरआय-एक्सटेंडेड पीपीएफ खाती आणि पालकांसह आजी-आजोबांनी उघडलेली सुकन्या समृद्धी खाती नियमित करणं यांचा समावेश आहे.

एनएसएसशी निगडीत नियम

सरकारने राष्ट्रीय बचत योजनेशी संबंधित नियमांमध्येही बदल केला आहे. एप्रिल १९९० च्या डीजी आदेशापूर्वी उघडण्यात आलेल्या दोन एनएसएस-८७ खात्यांबाबतचे नियम, २ पेक्षा जास्त एनएसएस-८७ खाती आणि महासंचालकांच्या आदेशानंतर उघडलेली खात्यांशी निगडीत नियम बदलण्यात आले आहेत. दोन एनएसएस-८७ खात्यांसाठी ०.२० टक्के अतिरिक्त व्याज पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज जोडले जाईल. महासंचालकांच्या आदेशानंतर उघडलेल्या खात्यावर सामान्य व्याजही मिळणार आहे. त्याचबरोबर २ पेक्षा जास्त एनएसएस-८७ खात्यांवर कोणतेही व्याज मिळणार नाही, त्यांची मूळ रक्कमही परत केली जाईल.

सुकन्या समृद्धीशी निगडित नियम

आजी-आजोबा किंवा कायदेशीर पालकांशिवाय इतर कोणी मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडलं तर त्यांचे पालकत्व पाहिले जाईल. मुलाच्या पालकाची बदली कायदेशीर पालकाकडे केली जाईल. एका कुटुंबातून दोन मुलींचं खातं उघडल्याचं आढळल्यास एसएसवाय २०१९ च्या परिच्छेद-३ चे उल्लंघन मानलं जाईल. ती खाती बंद केली जातील.

पीपीएफशी संबंधित नियम

  • मायनरच्या नावे उघडण्यात आलेल्या अनियमित अकाऊंच्या मॅच्युरिटीसाठीचं कॅलक्युलेशन त्यांच्या मॅच्युअर होण्याच्या तारखेच्या आधारावर केलं जाईल.
  • पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटवर मॅच्युरिटीच्या कालावधीपर्यंत म्हणजेच १८ वर्षापर्यंत व्याज दर मिळेल. यानंतर पब्लिक प्रॉव्हिडंट फंडानुसार व्याज मिळू लागेल.
  • अनिवासी भारतीयांच्या नावानं उघडण्यात आलेली पीपीएफ खाती ज्यामध्ये फॉर्म-एच मध्ये रहिवासी स्थिती जाहीर केलेली नाही, अशावेळी पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या व्याजदराचा फायदा होणार आहे. याचा फायदा त्या गुंतवणूकदारांना होईल जे ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अनिवासी भारतीय असतील.
  • जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती असतील तर प्राथमिक खात्यावरच व्याज दिलं जाईल. इतर सर्व खाती प्राथमिक खात्यांमध्ये विलीन केली जातील. या रकमेवर व्याज दिलं जाणार आहे.
टॅग्स :पीपीएफसरकारगुंतवणूक