Sukanya Samriddhi Yojana: जर तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ही मोदी सरकारने मुलींच्या नावाने सुरू केलेली योजना आहे. यामध्ये, मुलगी २१ वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रक्कम मिळते. अल्पबचत योजनेतील ही सर्वाधिक व्याज देणारी योजना आहे. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देते. मुलींच्या नावाने सुरू असलेल्या या योजनेत तुमचे पैसे तीन पटीने वाढण्याची हमी आहे.
या योजनेची विशेष बाब म्हणजे यामध्ये 250 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. इतर योजनांच्या तुलनेत यामध्ये व्याज देखील चांगले आहे. यासोबतच कर सवलतीचाही लाभ मिळतो. सुकन्या समृद्धी योजनेवर सरकार दरवर्षी 7.6 टक्के दराने व्याज देत आहे. एका आर्थिक वर्षात या योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. त्याच वेळी, खाते उघडल्यानंतर कोणत्याही आर्थिक वर्षात किमान 250 गुंतवले नाहीत, तर 50 रुपये दंड आकारला जातो. जर तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल, तर तिच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना खाते उघडले जाऊ शकते. योजनेची मॅच्युरिटी 21 वर्षांपर्यंत आहे. मात्र पालकांना 14 वर्षांसाठीच पैसे जमा करावे लागतात. उर्वरित वर्षांसाठी व्याज जमा होत राहते. या योजनेद्वारे 64 लाख रुपयांपर्यंतची रक्कम उभी केली जाऊ शकते.
केव्हा काढू शकता पैसे?
मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत त्यात जमा केलेले पैसे काढता येत नाहीत. 18 वर्षांनंतरही या योजनेतून एकूण रकमेच्या केवळ 50 टक्के रक्कम काढता येते. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर पूर्ण पैसे दिले जातात. पैसे एकरकमी किंवा हप्त्यांमध्येही मिळू शकतात. तुम्हाला वर्षातून एकदाच पैसे मिळतील. तुम्ही कमाल पाच वर्षांच्या कालावधीसाठी हप्त्यांमध्ये पैसे घेऊ शकता.
अकाऊंट ट्रान्सफर होतो का?
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडल्यानंतर तुम्ही भारतात कुठेही ट्रान्सफर करू शकता. पालकांनी निवासस्थान बदलल्याचा पुरावा दिल्यास, त्यांचे खाते विनामूल्य हस्तांतरित केले जाईल. जर असा कोणताही पुरावा दाखवला नाही, तर खाते हस्तांतरित करण्यासाठी 100 रुपये शुल्क पोस्ट ऑफिस किंवा ज्या बँकेत खाते उघडले आहे तेथे भरावे लागेल.