Join us

सुकन्या समृद्धीमध्ये मिळतंय ८.२% व्याज, संपूर्ण कालावधीत तितकंच राहणार का? समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 10:37 AM

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी करमुक्त लघु बचत योजना आहे. १० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे पालक मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी खातं उघडू शकतात.

सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही मुलींसाठी करमुक्त लघु बचत योजना आहे. १० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे पालक मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी खातं उघडू शकतात. ही योजना जानेवारी-मार्च तिमाहीसाठी ८.२ टक्के व्याज देत आहे. सुकन्या समृद्धीचा लाभ घेण्यासाठी, खाते उघडल्याच्या तारखेपासून 15 वर्षांपर्यंत पैसे जमा करावे लागतील. खातं उघडण्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी (१८ वर्षांची झाल्यावर) ते मॅच्युअर होईल. दरम्यान, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ८.२ टक्के व्याज दर संपूर्ण कार्यकाळासाठी निश्चित केलेला नाही. 

व्याज कसं मोजतात? 

सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर संपूर्ण कालावधीसाठी निश्चित केलेला नाही. केंद्र सरकार दर तिमाहीत लघु बचत योजनांचे व्याजदर बदलते. म्हणून, सुकन्या समृद्धीचे व्याजदर प्रत्येक तिमाहीत सरकारनं घोषित केलेल्या दरांनुसार बदलत राहतात. सरकारनं व्याजदरात वाढ केल्यास, वाढलेला दर त्या तिमाहीसाठी खात्यात उपलब्ध होईल. याउलट, सरकारनं व्याजदर कमी केल्यास खात्याला त्या विशिष्ट तिमाहीसाठी कमी दर मिळेल. बदलत्या आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक उद्दिष्टांच्या अनुषंगानं सरकार दर तिमाहीत बदल करते. 

५ तारखेचं आहे महत्त्व 

सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजाची गणना मासिक आधारावर केली जाते. प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेची शिल्लक त्या महिन्याचं व्याज मोजण्यासाठी वापरली जाते. जर ५ तारखेनंतर पैसे काढले गेले तर शिल्लक मोजताना काढलेली रक्कम वजा केली जाते. त्यानंतर मिळालेलं एकूण व्याज वर्षाच्या शेवटी शिल्लक रकमेमध्ये जोडलं जातं. चक्रवाढ पद्धतीनं दरवर्षी व्याज मोजलं जातं. त्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात पैसे जमा केले जातात. 

कसा मिळेल अधिक फायदा? 

सुकन्या समृद्धीमध्ये केलेली गुंतवणूक कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहे. पण यासाठी जुनी कर प्रणाली निवडावी लागेल. ठेवींवर मिळणारं व्याज देखील पूर्णपणे करमुक्त असतं, ज्यामुळे हा एक आकर्षक गुंतवणूक पर्याय बनतो. याशिवाय मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कमही करमुक्त असते. 

सुकन्या समृद्धीमध्ये मिळत असलेलं व्याज वाढवण्यासाठी, तज्ज्ञ प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करण्याची शिफारस करतात. यासह, गुंतवणुकीच्या रकमेवप वर्षभर चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो. यामुळे, महिन्याच्या योगदानाच्या तुलनेत एकूण रिटर्न अधिक असतो.

टॅग्स :गुंतवणूकसरकार