Tata Motors Share Price: टाटा उद्योग समुहाचे प्रमुख रतन टाटा(Ratan Tata) यांनी आपली जिद्द आणि प्रचंड मेहनतीने उभारलेल्या कंपनीचे विभाजन होणार आहे. आम्ही ज्या कंपनीबद्दल बोलत आहोत, ती टाटा मोटर्स (Tata Motors) आहे. टाटा मोटर्सचे दोन भागांमध्ये विभाजन करण्यास कंपनीच्या बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे. आता प्रवासी वाहनव्यवसाय (PV) आणि व्यावसायिक वाहनव्यवसाय (CV), असे दोन भाग केले जाणार आहेत. दरम्यान, टाटा मोटर्सचे सर्व शेअर होल्डर्स या दोन्ही कंपन्यांमध्ये समान भागीदार असतील.
कंपनीचे दोन भाग होतील
डिमर्जरनंतर एका युनिटमध्ये व्यावसायिक वाहने (CV) आणि त्या संबंधित गुंतवणूक असेल, तर दुसऱ्या युनिटमध्ये प्रवासी वाहने(PV), इलेक्ट्रिक वाहने(EV), जग्वार आणि लँड रोव्हरसह (JLR) संबंधित गुंतवणूक असेल. कंपनीने म्हटले की, NCLT सेटलमेंट योजनेद्वारे डिमर्जरची अंमलबजावणी केली जाईल. NCLT योजनेला टाटा मोटर्स बोर्ड, भागधारक, कर्जदार आणि नियामकांकडून मंजुरी आवश्यक आहे, हे सर्व 12-15 महिन्यांत पूर्ण केले जाऊ शकते.
कंपनीने काय म्हटले?
विशेष म्हणजे, टाटा मोटर्सचे CV, PV आणि JLR व्यवसाय 2021 पासून त्यांच्या संबंधित CEOच्या अंतर्गत स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. टाटा मोटर्सला आशा आहे की, या निर्णयामुळे कर्मचारी, ग्राहक आणि व्यावसायिक भागीदारांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले की, टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत वाढ केली आहे. तीन ऑटोमोटिव्ह व्यवसाय युनिट्स स्वतंत्रपणे कार्यरत असून, सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.
टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत
टाटा मोटर्सचे शेअर सोमवारी किंचित घसरणीसह बंद झाले. बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपनीचे शेअर्स 1.20 रुपयांच्या घसरणीसह 987.20 रुपयांवर बंद झाले. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 3,28,071.40 कोटी रुपये आहे. कंपनीने एका वर्षात 131 टक्के मजबूत परतावा दिला आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 995.75 आणि निच्चांक 400.40 आहे.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)