Join us  

Tata ग्रुप स्मार्टफोन बनवणार; Vivo कंपनीत 51% हिस्सा खरेदी करणार, लवकर अधिकृत घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 3:57 PM

सध्या टाटा भारतात iPhone चे उत्पादन करते.

Tata-Vivo Update : देशातील सर्वात विश्वासार्ह कंपनी Tata आता मोबाईल बनवण्याच्या व्यवसायात उतरणार आहे. कंपनीने सुमारे एक दशकापूर्वी मोबाईल नेटवर्क आणि हँडसेट केत्रात पदार्पण केले होते, पण आता कंपनीची स्मार्टफोन व्यवसायाकडे वाटचाल सुरू झाली आहे. यासाठी टाटा समूह चीनची एक मोठी कंपनी खरेदी करण्याची तयारी करत आहे. हा करार झाल्यावर चिनी कंपनीत Tata चा 51 टक्के हिस्सा असेल.

आम्ही ज्या चीनी कंपनीबद्दल बोलत आहोत, ती आघाडीची स्मार्टफोन उत्पादक कंपनी Vivo आहे. स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात उतरण्यासाठी टाटा समूहाने Vivo सोबत बोलणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, भारत सरकारने चिनी कंपन्यांना स्थानिक कंपन्यांसोबत भागीदारी करण्यास सांगितले आहे, त्यामुळेच विवो अनेक दिवसांपासून एका स्थानिक भागीदाराच्या शोधत होती. आता त्यांना टाटाच्या रुपात स्थानिक भागिदार मिळाला असून, लवकरच दोन्ही कंपन्यांमध्ये करार होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा ग्रुप आणि विवो, यांच्यात सध्या मूल्यांकनाबाबत चर्चा सुरू आहे. टाटाने जी ऑफर दिली आहे, त्यापेक्षा जास्त व्हॅल्युएशनची मागणी विवो करत आहे. टाटाने या करारात स्वारस्य दाखवले आहे, परंतु अद्याप दोन्ही कंपन्यांकडून कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष म्हणजे, vivo सोबतच oppo देखील एका स्थानिक भागिदाराच्या शोधात आहे. पण, त्यांना अद्याप कुणी भेटलेला नाही.

दरम्यान, टाटा समूह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात मोठा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी टाटा इलेक्ट्रॉनिक्स ही देशात iPhone बनवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. त्यांनी तैवानच्या विस्ट्रॉनचा प्लॅंट $125 मिलियनला विकत घेतला. आता त्यांची पेगाट्रॉनशी त्यांचा चेन्नईमधील आयफोन उत्पादन प्लँट खरेदीबाबत बोलणी सुरू आहे. याशिवाय टाटा इलेक्ट्रॉनिक्स तामिळनाडूच्या होसूरमध्ये आयफोन असेंबलिंग प्लँट बनवत आहे, जो आयफोनचा सर्वात मोठा असेंबलिंग प्लँट असेल.

Vivo ने प्रचंड नफा कमावला Vivo ने 2022-23 या आर्थिक वर्षात आजपर्यंतचा दुसरा सर्वाधिक नफा कमावला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 29,874.90 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचे सांगितले, तर 211 कोटी रुपयांचा निव्वळ नफाही कमावला आहे. पण, मागील आर्थिक वर्षात कंपनीला 123 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. सध्या विवोने देशातील प्रत्येक राज्यात भारतीय वितरकांची नियुक्ती सुरू केली आहे.

टॅग्स :टाटाविवोस्मार्टफोनव्यवसायअॅपल