बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही अनेक योजना (Post Office Scheme) चालवल्या जातात. या योजनांमध्ये, गुंतवणूकदारांना चांगलं व्याज मिळतं आणि कर सूट देखील मिळते. यापैकी एक योजना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आहे. ही योजना ५ वर्षात मॅच्युअर होते. एनएसईमध्ये सध्या ७.७ टक्के व्याज दिलं जात आहे. व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते. परंतु, रक्कम तुम्हाला मॅच्युरिटीवर दिली जाते. जर तुम्हाला या योजनेत पैसे गुंतवायचे असतील, तर तुम्ही त्याशी संबंधित काही नियम समजून घेतले पाहिजेत.
जर तुम्ही एनएससी मध्ये ५ वर्षांसाठी पैसे गुंतवले तर तुम्ही ते ५ वर्षापूर्वी काढू शकत नाही. तसंच यामध्ये अंशतः पैसेही काढता येत नाहीत. तुम्हाला मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा फक्त विशेष परिस्थितीत मिळेल, जसं की खातेदाराचा मृत्यू झाल्यास, संयुक्त खातेधारकांपैकी एक किंवा सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास, न्यायालयाचा आदेश जारी झाल्यावर किंवा जप्तीच्या प्रक्रियेत केवळ राजपत्रित अधिकारी काढून घेऊ शकतात.
मॅच्युरिटीनंतरही रक्कम न काढल्यास?
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही स्कीम ५ वर्षांनी मॅच्युअर होते, परंतु तुम्ही त्यातून रक्कम काढली नाही, तर ती आपोआप रिन्यू होत नाही. या परिस्थितीत, मॅच्युरिटीनंतरच्या कालावधीत, तुम्हाला एनएसईवर सामान्य बचत खात्यानुसार व्याज दिलं जातं आणि ते देखील पुढील दोन वर्षांसाठीच दिलं जाऊ शकते.
काय आहे नियम?
जर तुम्हाला मॅच्युरिटीनंतरही पुढील ५ वर्षे एनएससी चालू ठेवायची असेल, तर तुम्हाला त्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. अशा परिस्थितीत, ती नवीन तारखेचं डिपॉझिट मानलं जाईल आणि त्या तारखेला घेतलेल्या नवीन प्रमाणपत्राच्या व्याजानुसार त्यावरील व्याजाचा लाभही मिळेल.
किती करू शकता गुंतवणूक?
तुम्ही एनएसईमध्ये किमान १००० रुपये आणि त्यानंतर १०० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. कोणताही भारतीय नागरिक एनएससी खातं उघडू शकतो. एनएससी मुलाच्या नावानं त्याच्या/तिच्या पालकांच्या किंवा पालकाच्या वतीनंदेखील खरेदी केलं जाऊ शकतं, तर १० वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल त्याच्या/तिच्या नावानं देखील एनएससी खातं उघडू शकतं.