Join us  

आयत्या घरात घरोबा! भाडेकरुचा घस सोडण्यास नकार? घरमालकाने कुठे मागावी दाद?

By राहुल पुंडे | Published: October 11, 2024 12:24 PM

Landlord And Tenant Rights : जर तुमचा भाडेकरू घर खाली करण्यास नकार देत असेल किंवा घर भाड्याने देण्यापूर्वी काय काळजी घ्यावी? ह्या गोष्टी घरमालकाना माहिती असणे आवश्यक आहे.

Landlord And Tenant Rights : सुदेश आयटी कंपनीत कामाला असून पुण्यातील प्रसिद्ध भागात त्यांचं स्वतःचं २ मजली घर आहे. यात पहिल्या मजल्यावर सुदेश कुटुंबासह राहतात. तर दुसऱ्या मजल्यावरील २ फ्लॅट त्यांनी भाडेतत्वार दिले आहेत. ब्रोकरच्या माध्यमातून भाडेकरुन आल्याने सुदेशनेही जास्त चौकशी केली नाही. शिवाय मालमत्ता करात सूट सवलत मिळावी यासाठी भाडेकरारही केला नाही. मात्र, ही चूक भविष्यात खूप नडणार आहे, याची पुसटशी कल्पनाही सुदेशला नव्हती. काही वर्षानंतर सुदेशला एक फ्लॅट स्वतःला वापरण्यासाठी हवा होता. त्यानुसार त्याने एका भाडेकरुला घर खाली करण्यास सांगितले. मात्र, भाडेकरुने घर खाली करण्यास नकार दिला. तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही घर खाली करणार नाही, असं थेट उत्तर त्याला मिळालं. अशी घटना तुमच्याबाबतही घडू शकते. अशावेळी काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

कायदा काय सांगतो?देशातील बहुतेक कायदे हे भाडेकरुंच्या हक्काचे संरक्षण करणारे आहेत. याचा अर्थ असा नाही की घरमालकांना कुठलेच अधिकार नाही. वास्तविक, भाडेकरू कोणत्याही घरमालकाच्या घरावर हक्क सांगू शकत नाही. मात्र, काही परिस्थितींमध्ये, भाडेकरू घरमालकाच्या घरावर हक्क सांगू शकते. याला एडवर्स पजेशन म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याच्या जमिनीवर सतत १२ वर्षे कब्जा केला आणि त्या कालावधीत मूळ मालकाने कोणताही आक्षेप घेतला नाही, तर कब्जा करणारी व्यक्ती त्या जमिनीची कायदेशीर मालक होऊ शकते. हा कायदा इंग्रजांनी बनवला होता.

कुठे दाद मागावी?आपल्या मालमत्ताविषयक वाद सोडवण्यासाठी प्रत्येक राज्यात ‘स्टेट कॉम्पिटण्ट ऑथॉरिटी’ची स्थापना करण्यात आली आहे. ही नियुक्ती रेंट कंट्रोल अॅक्टनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे भाडेकरूबाबत काहीही अडचण आल्यास मालकाने या अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. इथे जर प्रश्न सुटला नाही तर तुम्ही न्यायालयातही दाद मागू शकता.

काय काळजी घ्यावी?भाडेकरू आणि मालक यांच्यातील नाते पारदर्शक आणि कायदेशीर असणे आवश्यक आहे. घरमालक आणि भाडकरू दोघांनाही भविष्यात होणारा त्रास टाळायचा असेल तर भाडेकरार करणे आवश्यक आहे. करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी भाडेकरूविषयी पूर्ण माहिती करून घ्यावी. पूर्वीच्या मालकाकडे भाडेकरुची चौकशी करून घेता येईल. भाडेकरूचा कायमस्वरूपी वैध पत्ता, ऑफिसचाही पत्ता आणि भाडेकरूने दिलेली सर्व कागदपत्रे पडताळून घ्या. 

टॅग्स :बांधकाम उद्योगसुंदर गृहनियोजनन्यायालय